Video - एक, दोन नव्हे तर चोरांची अख्खी गँगच; काही सेकंदात खिशातून लंपास केला फोन अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 19:52 IST2025-05-17T19:50:17+5:302025-05-17T19:52:14+5:30
एका बसमधील चोरीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. चोर दिवसाढवळ्या बसमध्ये चढून प्रवाशांचे मोबाईल आणि पाकिटावर डल्ला मारतात.

Video - एक, दोन नव्हे तर चोरांची अख्खी गँगच; काही सेकंदात खिशातून लंपास केला फोन अन्...
दिल्लीतील बसेसमध्ये आता चोरांची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. हे चोर दिवसाढवळ्या बसमध्ये चढून प्रवाशांचा मोबाईल आणि पाकिटावर डल्ला मारतात. धक्कादायक बाब म्हणजे बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असूनही या चोरांना याचा अजिबात धाक राहिलेला नाही. ते अगदी उघडपणे चोरी करताना दिसतात. असाच एका बसमधील चोरीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
एक, दोन नव्हे तर चोरांची अख्खी गँगच असलेली पाहायला मिळत आहे. दिल्लीतील एका एसी बसचं सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. यामध्ये चोरांची गँग बसमध्ये चढते. एका व्यक्तीला ते घेरतात. काही समजायच्या आत अवघ्या काही सेकंदात ते त्या व्यक्तीचा मोबाईल खिशातून चोरतात आणि आपल्या साथीदारांच्या मदतीने तो गुल करतात.
Delhi buses have been taken over by pickpocketers:
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) May 16, 2025
pic.twitter.com/tIWqs2ddGB
सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, एक व्यक्ती बसमध्ये चढताच, ४ ते ५ चोर त्याला सर्व बाजूंनी घेरतात. गर्दीचा फायदा घेत ते अत्यंत हुशारीने त्याच्या खिशातून मोबाईल काढतात आणि लंपास करतात. जेव्हा त्या व्यक्तीला कळतं की त्याचा मोबाईल हरवला आहे, तेव्हा तो इकडे तिकडे शोधू लागतो. पण चोर इतक्या हुशारीने फोन लपवतात की नेमका मोबाईल कोणी चोरला आहे हे त्या व्यक्तीला कळत नाही.
चोरांची ही गँग इतक्यावरच थांबली नाही. तर त्यांचं धाडस बघा, फोन चोरल्यानंतर ते त्याच व्यक्तीशी असं बोलतात जणू काही त्यांनी काहीच केलेलं नाही. ते त्याच्याकडे मोबाईल नंबरही मागतात जेणेकरून ते मोबाईल शोधण्यात मदत करत आहेत असं दाखवतात. ही संपूर्ण घटना बसमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे आणि आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
इन्स्टाग्रामवर @gharkekalesh नावाच्या पेजवर बसमधील चोरीचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. चोरांचा हा कारनामा पाहून सर्वांनाच धक्का बसला. काही लोकांनी त्यांना आलेला असाच अनुभवही शेअर केला आहे. माझा फोनही अशाच प्रकारे बसमधून, ट्रेनमधून चोरीला गेल्याचं म्हटलं आहे.