Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 14:06 IST2026-04-10T14:05:37+5:302026-04-10T14:06:41+5:30
Abhinav Arora Car Attack: उत्तर प्रदेशातील वृंदावन येथील १० वर्षांचा कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरो याच्यावर दिल्लीत जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
उत्तर प्रदेशातील वृंदावन येथील १० वर्षांचा कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरो याच्यावर दिल्लीत जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ७ एप्रिल रोजी रात्री १० च्या सुमारास दिल्लीतील टिळक नगर परिसरात ही घटना घडली, जेव्हा अभिनव आपल्या कुटुंबासह कारमधून जात होता. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अचानक काही लोकांनी त्यांच्या कारला घेराव घातला आणि शिवीगाळ करत हल्ला करण्यास सुरुवात केली.
कारच्या काचा फोडल्या
हल्ल्याचा व्हिडीओ अभिनव अरोराने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला असून तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये जमाव काठ्यांनी कारवर हल्ला करताना आणि काचा फोडताना स्पष्ट दिसत आहे. कारमध्ये असलेले कुटुंबातील सदस्य भीतीपोटी ओरडताना ऐकू येत आहेत. कारची पुढची काच फुटताच आत बसलेल्या एका महिलेचा जोरात ओरडण्याचा आवाज आला, ज्यावरून परिस्थिती किती भयानक होती हे स्पष्ट होतं.
वादाला हिंसक वळण
अभिनवचे वडील तरुण राज अरोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दरम्यान त्यांना बेदम मारहाण करण्यात आली, ज्यामध्ये ते जखमी झाले आहेत. हल्लेखोरांनी असा आरोप केला होता की, त्यांच्या कारमुळे एका मुलाच्या पायाला दुखापत झाली आहे. याच कारणावरून वाद सुरू झाला आणि पाहता पाहता त्याला हिंसक वळण लागलं.
तीन जणांना अटक
घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तातडीने कारवाई करत गुन्हा दाखल केला. प्राथमिक तपासाच्या आधारावर तीन जणांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी पुढील कारवाई करत त्यांना नंतर अटक केली. सध्या पोलीस परिसरातील CCTV फुटेज तपासत असून घटनेच्या सर्व पैलूंचा तपास सुरू आहे.
मुलाला दुखापत नाही
तरुण राज अरोरा यांच्या म्हणण्यानुसार, पोलीस त्यांना आणि त्या मुलाला रुग्णालयात घेऊन गेले. तिथे डॉक्टरांनी स्पष्ट केलं की, मुलाला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. दुसरीकडे, मारहाणीत जखमी झालेल्या तरुण राज अरोरा यांच्यावर उपचार करण्यात आले. या प्रकरणाचा गांभीर्याने तपास केला जात आहे. सर्व आरोपींची ओळख पटवून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. CCTV फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबाच्या आधारे घटनेचा पूर्ण तपास केला जात असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.