कुजलेला अवस्थेत आढळला मृतदेह; भोजनालय संचालक दांपत्याची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 21:12 IST2021-07-26T21:11:52+5:302021-07-26T21:12:59+5:30
Suicide Case :आर्थिक टंचाईतून आत्महत्येचा संशय

कुजलेला अवस्थेत आढळला मृतदेह; भोजनालय संचालक दांपत्याची आत्महत्या
चंद्रपूर : येथील चंद्रपूर-बल्लारपूर महामार्गावरील ममता भोजनालयाच्या संचालक दांपत्याने भोजनालयातच गळफास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी उघडकीस आली. चंद्रभान दुबे (६०), मंजू दुबे (५०) रा. टॉवर टेकडी असे मृतक दांपत्याचे नाव आहे. दोघांचाही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने तीन ते चार दिवसांपूर्वीच आर्थिक टंचाईतून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावरील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर ममता भोजनालय आहे. चंद्रभान दुबे व मंजू दुबे हे दांपत्य भोजनालय चालवून आपला उदरनिर्वाह करीत होते. सोमवारी काही नागरिक फिरायला गेले असता, भोजनालयातून दुर्गंधी येत होती. काही नागरिकांनी आतमध्ये डोकावून पाहिले असता, चंद्रकांत दुबे हे खाली पडलेल्या अवस्थेत तर त्यांची पत्नी फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. या घटनेची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला. दोघांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने मागील दोन ते तीन दिवसांपूर्वी गळफास घेतल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. कोरोनामुळे उपजीविका भागविण्यासाठी त्यांना फक्त भोजनालयाचा आधार होता. मात्र, भोजनालय व्यवस्थित न चालल्यामुळे आर्थिक चणचणीमुळे आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तविल्या जात आहे.
बाॅबीचा साथीदार ऑगीच्या शोधात पोलीस; गांजा प्रकरणाचे धागेदोरे संपूर्ण जिल्हयातhttps://t.co/U1NYVntbEy
— Lokmat (@MiLOKMAT) July 26, 2021