बंगळुरू हादरलं! घरात तरुणीचा कुजलेला मृतदेह सापडला; बंद खोलीत नेमकं घडलं काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 17:38 IST2026-04-28T17:27:26+5:302026-04-28T17:38:05+5:30
बंगळुरुमध्ये एका तरुणीचा सडलेल्या अवस्थेतीतल मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.

बंगळुरू हादरलं! घरात तरुणीचा कुजलेला मृतदेह सापडला; बंद खोलीत नेमकं घडलं काय?
Bengaluru Crime: आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरू शहरातून एक थरारक घटना समोर आली आहे. झारखंडची रहिवासी असलेल्या एका ३४ वर्षीय महिलेचा मृतदेह तिच्या भाड्याच्या घरात कुजलेल्या आणि नग्न अवस्थेत आढळून आला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि संशयाचे वातावरण पसरले आहे.
मृत महिलेची ओळख पूजा दत्ता (३४) अशी झाली असून ती मूळची झारखंडमधील धनबादची रहिवासी होती. पूजा बेंगळुरूच्या अदुगोडी परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये गेल्या तीन वर्षांपासून एकटीच राहत होती. ती एकानामांकित कंपनीत कामाला होती, मात्र अलीकडेच तिने नोकरी सोडली होती.
सोमवारी पूजाच्या घरातून प्रचंड दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, समोरचे दृश्य पाहून पोलिसांनाही धक्का बसला. पूजाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात नग्न अवस्थेत पडलेला होता आणि तो अर्धवट सडलेल्या स्थितीत होता.
दोन-तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा संशय
फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या प्राथमिक अंदाजानुसार, पूजाचा मृत्यू हा मृतदेह सापडण्याच्या दोन ते तीन दिवस आधी झाला असावा. पूजाला शेवटचे २३ एप्रिल रोजी किराणा सामान आणण्यासाठी घराबाहेर पडताना पाहिले होते, अशी माहिती घरमालकिणीने पोलिसांना दिली.
घटनास्थळी विखुरलेले कागद आणि संशय
तपासादरम्यान पोलिसांना घरातून कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. मात्र, संपूर्ण खोलीत काही फाडलेले कागद विखुरलेले आढळले आहेत. दरवाजा आतून बंद असल्याने तिने स्वतःचे जीवन संपवले असावे, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. तरीही, मृतदेह नग्न अवस्थेत आणि रक्ताच्या थारोळ्यात असल्याने पोलिसांनी हत्येची शक्यताही नाकारलेली नाही.
पोस्टमार्टम रिपोर्टकडे सर्वांचे लक्ष
बंगळुरू पोलिसांनी संशयास्पद मृत्यू अशी नोंद करून तपास सुरू केला आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, "महिलेच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच ही आत्महत्या होती की हत्या, याचा उलगडा होईल."