पैशांची चणचण, कर्जाचा डोंगर... यूट्यूबवरुन शिकले अन् पती-पत्नीने घरातच छापल्या नकली नोटा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 13:00 IST2025-12-31T12:59:05+5:302025-12-31T13:00:38+5:30
आर्थिक चणचण आणि कर्जाच्या ओझ्यामुळे एका ग्रामीण भागातील दाम्पत्याला गुन्हेगारीच्या मार्ग स्वीकारावा लागला आहे.

फोटो - आजतक
आर्थिक चणचण आणि कर्जाच्या ओझ्यामुळे एका ग्रामीण भागातील दाम्पत्याला गुन्हेगारीच्या मार्ग स्वीकारावा लागला आहे. छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यात पोलिसांनी अशाच एका पती-पत्नीला अटक केली आहे, ज्यांनी घरात बसून नकली नोटा छापून त्या बाजारात चालवण्याचा मार्ग निवडला होता. पोलिसांनी आरोपींकडून सुमारे १ लाख ७० हजार रुपयांच्या नकली नोटा, एक कलर प्रिंटर, कागद आणि इतर साहित्य जप्त केलं आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुण कुमार तुरंग आणि त्याची पत्नी राखी तुरंग अशी आरोपींची नावं आहेत. हे दाम्पत्य आर्थिक संकटात होतं आणि त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर कर्ज होतं. याच दबावाखाली त्यांनी यूट्यूबवर व्हिडिओ पाहून नकली नोटा छापण्याची पद्धत शिकली. यासाठी त्यांनी ऑनलाइन कलर प्रिंटर आणि इतर साहित्य मागवले. त्यानंतर घरातच नोटा छापून त्या आसपासच्या स्थानिक बाजारपेठांमध्ये चलनात आणण्यास सुरुवात केली.
असा झाला उलगडा
राणीतराई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका साप्ताहिक बाजारात नकली नोटा चालवल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. यादरम्यान बाजारात भाजी विकण्यासाठी आलेल्या तुलेश्वर सोनकर यांनी तक्रार केली की, एका स्त्री-पुरुषाने ६० रुपयांची भाजी खरेदी करून ५०० रुपयांची नोट दिली. नंतर इतर व्यापाऱ्यांनी नकली नोटांबाबत चर्चा सुरू केल्यावर त्याने आपली गल्ला तपासला असता त्यात एक बनावट नोट आढळली.
तपासादरम्यान पोलिसांनी बाजारात संशयास्पद रितीने फिरणाऱ्या अरुण आणि त्याच्या पत्नीला ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे नकली नोटा सापडल्या. चौकशीत अरुणने नोटा छापल्याची आणि त्या बाजारात चालवल्याची कबुली दिली. आरोपी अरुण यापूर्वीही चोरीच्या प्रकरणात जेलमध्ये जाऊन आल्याचं पोलिसांनी सांगितलं.
घरावर छापा आणि मुद्देमाल जप्त
पोलिसांनी रायपूर जिल्ह्यातील मुजगहन येथील सोनपॅरी गावात असलेल्या आरोपींच्या घरावर छापा टाकला. तिथे नोटा छापण्यासाठी वापरलेला कलर प्रिंटर, कागद आणि एकूण १,७०,५०० रुपयांचे बनावट चलन मिळाले. यामध्ये १००, २०० आणि ५०० रुपयांच्या नोटांचा समावेश होता. यातील काही नोटा बाजारात चालवण्यात आल्या होत्या, तर काही नोटांची तयारी सुरू होती.
एसएसपींनी काय सांगितलं?
दुर्गचे एसएसपी विजय अग्रवाल यांनी सांगितलं की, "दोन आरोपींना पकडण्यात आलं असून त्यांच्याकडून कलर प्रिंटर आणि सुमारे १ लाख ७० हजार रुपयांच्या नकली नोटा जप्त केल्या आहेत. त्यांनी आपल्या सोनपॅरी गावातील घरात या नोटा छापल्या होत्या. त्यांनी पाटण आणि राणीतराई येथील बाजारपेठेत या नोटा चालवण्याचा प्रयत्न केला." पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली आहे.