गँगरेप झालेल्या अल्पवयीन मुलीचा मृत्यू; घाबरून पोलिसांना कळवली नाही घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2021 19:29 IST2021-02-25T19:28:37+5:302021-02-25T19:29:16+5:30
Gangrape Case : तिचा मृत्यू झाल्यावर तिला गावातून एका कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये नेले जात होते, असेही त्यांनी पुढे सांगितले.

गँगरेप झालेल्या अल्पवयीन मुलीचा मृत्यू; घाबरून पोलिसांना कळवली नाही घटना
उत्तर प्रदेशातील हमीरपूर येथील गावात दोन दिवसांपूर्वी सामूहिक बलात्कार झालेल्या १७ वर्षीय मुलीचा बुधवारी मृत्यू झाला. तिला रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिस अधीक्षक नरेंद्र कुमार सिंह यांनी सांगितले की, या अल्पवयीन मुलीचे गावात उपचार सुरू होते. परंतु मंगळवारी तिची प्रकृती खालावू लागली. त्यामुळे तिला दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले होते. तिचा मृत्यू झाल्यावर तिला गावातून एका कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये नेले जात होते, असेही त्यांनी पुढे सांगितले.
दरम्यान, सर्कल अधिकारी मौदाहा, सौम्या पांडे म्हणाल्या की, पीडितेच्या कुटूंबाने घटनेची पोलिसात नोंद केली नाही आणि अल्पवयीन मुलीच्या मृत्यूनंतरच पोलिसांना याबद्दल कळले. त्या पुढे म्हणाल्या, “आम्ही शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहोत आणि या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.” पत्रकारांशी बोलताना पीडित मुलीच्या वडिलांनी आरोप केला की, सोमवारी रात्री त्यांच्या मुलीवर पाच जणांनी बलात्कार केला. ते घाबरले होते म्हणून पोलिसांना माहिती दिली नाही असे ते म्हणाले.