इच्छेविरुद्ध लग्न लावल्याने पत्नीने रचला 'खुनाचा कट'; सासरच्यांना अडवून दुसऱ्यासोबत थाटला संसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 09:28 IST2025-11-09T09:19:45+5:302025-11-09T09:28:07+5:30
कथित हुंडाबळीत 'मृत' ठरवलेली एक विवाहित महिला पोलिसांना मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथून जिवंत सापडली आहे.

इच्छेविरुद्ध लग्न लावल्याने पत्नीने रचला 'खुनाचा कट'; सासरच्यांना अडवून दुसऱ्यासोबत थाटला संसार
UP Crime: उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यातून एक हादरवून टाकणारा प्रकार समोर आला आहे, ज्यामुळे केवळ पोलीसच नाही, तर संपूर्ण गावाला धक्का बसला आहे. गाझीपूरमध्ये हुंडाबळीमध्ये हत्या झालेली विवाहित महिला, प्रत्यक्षात मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर शहरात आपल्या प्रियकरासोबत सुखाने नांदत असल्याचे उघड झाले आहे. सासरच्यांनी हुंड्यासाठी विवाहितेचा खून करून मृतदेह गायब केल्याचा आरोप होता. मात्र आता ती जिवंत असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली. या प्रकरणामुळे तिच्या पतीसह सासरच्या सहा जणांवर हुंडाबळीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाची सुरुवात गाझीपूरमधील बरहपार भोजूराय गावातून झाली. राजवंती देवी यांनी २०२३ साली आपली मुलगी रुची हिचे लग्न खानपूर भागातील राजेंद्र यादव यांच्याशी लावून दिले होते. गेल्या वर्षी ३ ऑक्टोबर रोजी रुचीच्या आईने थेट पोलीस अधीक्षकांना अर्ज देऊन एक भयंकर आरोप केला. त्यांनी तक्रार केली की, त्यांच्या मुलीची तिच्या सासरच्या मंडळींनी हत्या केली असून तिचा मृतदेह कुठेतरी गायब केला आहे. या तक्रारीच्या आधारावर, पोलिसांनी रुचीचा पती राजेंद्र, सासू कमली देवी यांच्यासह कुटुंबातील एकूण सहा लोकांविरुद्ध हुंडाबळी, मृतदेह नष्ट करणे आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला होता.
प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलीस अधिकारी रामकृष्ण तिवारी यांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेतली. सर्व्हिलन्स टीमच्या मदतीने जेव्हा मृत मानल्या गेलेल्या रुचीची मोबाईल लोकेशन तपासण्यात आली, तेव्हा पोलिसांना मोठा धक्का बसला. ती महिला जिवंत होती आणि ग्वाल्हेरमध्ये तिचा प्रियकर गजेंद्र यादव याच्यासोबत राहत असल्याची माहिती मिळाली.
माहिती मिळताच, ७ ऑक्टोबर रोजी पोलीस पथक तातडीने ग्वाल्हेरला रवाना झाले आणि त्यांनी विवाहितेला सुखरूप ताब्यात घेऊन गाझीपूरला आणले. पोलीस चौकशीत रुचीने सत्य उघड केले. तिने सांगितले की, तिचे हे लग्न तिच्या इच्छेविरुद्ध लावून देण्यात आले होते. ती दहावीत असल्यापासूनच रेवई गावातील गजेंद्रवर प्रेम करत होती आणि संधी मिळताच ती त्याच्यासोबत पळून गेली आणि दुसरे लग्न करून ग्वाल्हेरमध्ये आनंदाने राहत होती.
रुची जिवंत सापडल्यानंतर, खोट्या गुन्ह्यात अडकलेल्या तिच्या पहिल्या पतीच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला. पती राजेंद्र यादवने सांगितले की, "आम्ही पूर्णपणे निर्दोष आहोत, आम्हाला जाणीवपूर्वक फसवण्यात आले. रुची आमच्यासोबत कधीच राहिली नाही आणि नेहमी भांडण करायची. तिच्या घरच्यांना तिच्या प्रेमसंबंधाबद्दल सर्व माहिती होती, तरीही त्यांनी आम्हाला जाणूनबुजून या खोट्या केसमध्ये अडकवले." सासू कमली देवी यांनीही याच भावना व्यक्त केल्या आणि खोटा गुन्हा दाखल करणाऱ्यांवर सख्त कायदेशीर कारवाई करण्याची तसेच त्यांचे घेतलेले दागिने-पैसे परत मिळवून देण्याची मागणी केली.
पोलिसांच्या तपासामध्ये हुंडाबळीचा संपूर्ण आरोप खोटा असल्याचे आढळले आहे. सध्या विवाहितेला वैद्यकीय तपासणीनंतर न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, आता या प्रकरणात खोटा गुन्हा दाखल करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याची तयारी सुरू आहे. आता खोटे आरोप करणाऱ्यांवर पोलीस कोणती कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.