सुनेवर अत्याचार, पतीचं बाहेर अफेअर; दीप्तीच्या भावाने 'कमला पसंद'च्या मालकाच्या कुटुंबावर केले आरोप!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 17:04 IST2025-11-26T17:03:16+5:302025-11-26T17:04:47+5:30
दीप्तीचा भाऊ ऋषभ चौरसिया यांनी सासरच्या लोकांवर छळ आणि पती हरप्रीत यांच्यावर विवाहबाह्य प्रेमसंबंधांचे गंभीर आरोप केले आहेत.

सुनेवर अत्याचार, पतीचं बाहेर अफेअर; दीप्तीच्या भावाने 'कमला पसंद'च्या मालकाच्या कुटुंबावर केले आरोप!
देशातील नामांकित ब्रँड 'कमला पसंद' पान मसाला कंपनीच्या मालकाच्या सुनेने दिल्लीतील आपल्या निवासस्थानी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दीप्ती असे मृत सुनेचे नाव असून, तिने आत्महत्येसाठी पती आणि त्यांच्यातील सततच्या वादाला जबाबदार धरले आहे. या घटनेनंतर दीप्तीचा भाऊ ऋषभ चौरसिया यांनी सासरच्या लोकांवर छळ आणि पती हरप्रीत यांच्यावर विवाहबाह्य प्रेमसंबंधांचे गंभीर आरोप केले आहेत.
दिल्ली पोलिसांनी बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, 'कमला पसंद' कंपनीच्या मालकाच्या ४० वर्षीय सुनेने कथितरित्या आपल्या घरी आत्महत्या केली. मंगळवारी दीप्ती आपल्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. पती हरप्रीत यांनी तिला तातडीने सफदरजंग रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळावरून एक सुसाईड नोट आणि डायरी जप्त केली आहे, ज्यामुळे दीप्ती आणि तिच्या पतीमध्ये सतत वैवाहिक वाद सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भावाने केले गंभीर आरोप
दीप्तीचा भाऊ ऋषभ चौरसिया यांनी माध्यमांशी बोलताना सासरच्या लोकांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. ऋषभ यांनी सांगितले की, "माझ्या बहिणीची सासू आणि पती तिला वारंवार मारहाण करत असत आणि तिचा छळ करत असत. दीप्तीचा पती हरप्रीत याचं दुसऱ्या एका मुलीसोबत अफेअर होतं. आम्हाला हे कळल्यावर आम्ही तिला घरी परत घेऊन आलो. यानंतर दीप्तीच्या सासूने 'आम्ही तिला मुलीसारखे ठेवू' असे आश्वासन देऊन तिला पुन्हा घरी नेले. माझी बहीण फोन करून सांगायची की, तिला खूप त्रास दिला जात आहे आणि तिच्या पतीचे अफेअर सुरूच आहेत."
घरातील कलहामुळे वडिलांना ब्रेन स्ट्रोक
घरातील या सततच्या कलहामुळे दीप्तीच्या वडिलांना ब्रेन स्ट्रोक आला आणि ते कोमामध्ये गेले, अशी माहितीही ऋषभ यांनी दिली. वडिलांच्या आजारानंतर बहिणीने पुन्हा एकदा तक्रार केली, तेव्हा आम्ही तिला घरी घेऊन आलो होतो, पण सासू पुन्हा तिला घेऊन गेली, असे ऋषभ यांनी सांगितले.
आम्हाला न्याय हवा आहे!
दीप्ती चौरसिया यांचा विवाह २०१० मध्ये झाला होता. ऋषभ यांनी सांगितले की, "मला नाही माहीत की माझ्या बहिणीची हत्या झाली आहे की तिने आत्महत्या केली आहे." त्यांनी पोलिसांसमोर स्पष्ट केले की, दोन-तीन दिवसांपूर्वीच माझे तिच्याशी बोलणे झाले होते.
ऋषभ म्हणाले, माझ्या बहिणीचे तिच्या पतीसोबतचे संबंध चांगले नव्हते. तो तिला शारीरिक त्रास देत असे आणि शिवीगाळ करत असे. मला फक्त न्याय हवा आहे. सध्या दीप्ती आणि हरप्रीत यांच्यातील सततच्या वादांमुळे हे जोडपे दोन वेगवेगळ्या घरांमध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दीप्तीला दोन मुले आहेत. शवविच्छेदन अहवालाची पोलीस वाट पाहत असून, पुढील तपास सुरू आहे.