प्रेमात धोका! मिस कॉलने जोडले नाते, प्रियकराने तोडले! गर्भवती प्रेयसीचा गर्भपात करून स्टेशनवर सोडून पळाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 17:32 IST2025-11-24T17:31:03+5:302025-11-24T17:32:52+5:30
मिस कॉलने सुरू झालेल्या या प्रेम कहाणीचा शेवट प्रियकराने तरुणीला राजस्थानमधील रेल्वे स्टेशनवर सोडून पळ काढण्यात झाला.

AI Generated Image
प्रेम, जात-पात आणि महिला अत्याचाराची एक हादरवून टाकणारी घटना उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातून समोर आली आहे. रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाने तरुणीसोबत प्रेमसंबंधाच्या नावाखाली केलेला विश्वासघात माणुसकीला काळीमा फासणारा आहे. मिस कॉलने सुरू झालेल्या या प्रेम कहाणीचा शेवट प्रियकराने तरुणीला राजस्थानमधील रेल्वे स्टेशनवर सोडून पळ काढण्यात झाला.
मिस कॉलने जोडले, कोर्ट मॅरेजने संपवले नाते!
मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे दीड वर्षांपूर्वी रोहित आणि नॅन्सी यांचा परिचय एका मिस कॉलमुळे झाला होता. या परिचयाचे रूपांतर लवकरच प्रेमात झाले. दोघांनी एकत्र जगण्याच्या आणाभाका घेतल्या. जेव्हा नॅन्सीच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न दुसरीकडे ठरवले, तेव्हा रोहितने तिला पळवून नेले आणि सुमारे एक वर्षापूर्वी दोघांनी कोर्ट मॅरेज केले. या लग्नामुळे नॅन्सीच्या कुटुंबीयांनी तिच्याशी सर्व संबंध तोडले आणि 'स्वेच्छेने लग्न केले आहेस, आता त्याच्यासोबतच राहा,' असे तिला स्पष्टपणे सांगितले.
राजस्थानमध्ये विश्वासघाताचा कळस
कोर्ट मॅरेज झाल्यावर रोहित नॅन्सीला घेऊन राजस्थानला गेला. मात्र, तिथे गेल्यावर रोहितने विश्वासघाताच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. नॅन्सीच्या म्हणण्यानुसार, रोहितने तिथे केवळ तिचे शारीरिक शोषण केले नाही, तर त्याने आपल्या मित्रांनाही तिच्या खोलीत पाठवून तिच्यावर अत्याचार करण्यास लावले. या भयानक अत्याचारातून नॅन्सी गर्भवती राहिली. ती तीन महिन्यांची गर्भवती झाल्यावर रोहितने तिचा जबरी गर्भपातही करवला. त्यानंतर तो तिला राजस्थानच्या रामनगर रेल्वे स्टेशनवर एकटीला सोडून पळून गेला.
स्टेशनवर तरुणीचा टाहो
निराधार झालेल्या आणि रडणाऱ्या नॅन्सीला पाहून कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तिची चौकशी केली. नॅन्सीने तिची सर्व कहाणी पोलिसांना सांगितली. पोलिसांनी लगेचच तिच्या वडिलांना बोलावले आणि मुलीला घरी घेऊन जाण्याची विनंती केली. मात्र, वडिलांनीही ‘तिने स्वतःच्या मर्जीने लग्न केले आहे, आता तिने त्याच मुलासोबत राहावे,’ असे सांगत तिला स्वीकारण्यास साफ नकार दिला.
नॅन्सीने हताश होऊन आपल्या भावना व्यक्त केल्या, "रोहितने माझ्याशी कोर्ट मॅरेज केले, माझा वापर केला, माझा गर्भपात करवला आणि आता मला सोडून पळून गेला. माझे घरचेही मला स्वीकारत नाहीत आणि नवराही नाही. मी कुठे जावे?" या परिस्थितीत नॅन्सीने आपण रोहितसोबतच राहू इच्छितो, असे सांगून त्याला शोधण्याची पोलिसांना विनंती केली आहे. रामनगर पोलीस सध्या विश्वासघात करणाऱ्या रोहितचा शोध घेत आहेत.