जामताडा बनण्याच्या मार्गावर 'हे' शहर; 615 सायबर ठगांना अटक, 100 कोटींची फसवणूक उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 12:40 IST2025-11-03T12:39:31+5:302025-11-03T12:40:00+5:30
Cyber Fraud in Rajasthan: झारखंडमधील जामताडा एकेकाळी सायबर फसवणुकीचे केंद्र होते.

जामताडा बनण्याच्या मार्गावर 'हे' शहर; 615 सायबर ठगांना अटक, 100 कोटींची फसवणूक उघड
Cyber Fraud in Rajasthan: झारखंडमधील जामताडा अनेकांना माहिती आहे. हे शहर एकेकाळी सायबर फसवणुकीचे केंद्र होते. आता देशातील विविध शहरांमध्येही अशाच प्रकारच्या घटना घडत आहेत. नुकतंच राजस्थान पोलिसांनी मोठी कारवाई करत डीग येथून 61 सायबर ठगांना अटक केली आहे. या ठगांनी 100 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. ही घटना पाहता, डीग दुसरे जामाताडा तर बनत नाहीये ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
घेराबंदी करुन 61 ठग पकडले
डीग तालुक्यातील गोपालगड परिसरातील हेवतका आणि नावदा गावांमध्ये पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. या मोहिमेत 48 प्रौढ आणि 13 अल्पवयीन ठगांना अटक करण्यात आली. विशेष म्हणजे, पोलिसांनी गेल्या तीन महिन्यांत डीग शहरातून एकूण 615 ठगांना पकडले असून, तब्बल 100 कोटी रुपयांहून अधिकचा फसवणुकीचा खुलासा केला आहे.आहे.
मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी 33 स्मार्टफोन, 65 सिमकार्ड, 22 एटीएम कार्ड, चेकबुक्स, एचडीएफसी बँकेची स्वॅप मशीन, दोन लक्झरी कार आणि दुचाकी जप्त केल्या आहेत. प्राथमिक चौकशीत उघड झाले की, या ठगांच्या बँक खात्यांमधून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. पोलिसांनी त्यांचे सर्व अकाउंट्स आणि मालमत्ता तपासणीसाठी सील केली आहेत.
डीएसपी गिरिराज मीणा यांच्या नेतृत्वाखाली मोहीम
डीग पोलीस उपअधीक्षक गिरिराज मीणा यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. भरतपूर रेंजचे आयजी कैलाश बिश्नोई यांनी सांगितले की हे ठग किरायाने बँक खाती घेत फसवणुकीची रक्कम त्यात जमा करत. त्यातील एक आरोपी यापूर्वी अलवरमध्ये 20 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणातही अटक झाला होता.
कशी करत होते फसवणूक
आरोपी बनावट किंवा चोरीच्या सिमकार्डचा वापर करून व्हॉट्सअॅप, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ओएलएक्ससारख्या साइट्सवर कमी दरात वस्तू विकण्याचे आमिष दाखवत. कधी गरीबांना मदत करण्याच्या नावाखाली, तर कधी नोकरी किंवा गुंतवणुकीच्या ऑफर देऊन लोकांकडून रक्कम उकळत असत. पोलिसांच्या या कारवाईनंतर डीग आणि आसपासच्या भागात सायबर ठगांचे जाळे मोठ्या प्रमाणात मोडीत निघाले आहे.