८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 08:12 IST2025-10-27T08:06:26+5:302025-10-27T08:12:36+5:30
पॅरिसच्या प्रसिद्ध लूव्र म्युझियममधून क्राउन ज्वेल्सच्या चोरीप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.

८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
पॅरिसच्या प्रसिद्ध लूव्र म्युझियममधून क्राउन ज्वेल्सच्या चोरीप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. चोरीच्या घटनेनंतर जवळपास एक आठवड्यानी चोरांना अटक करण्यात आली. चोरांनी म्युझियममधून १०२ मिलियन डॉलर म्हणजेच ८ अब्ज रुपयांपेक्षा जास्त किमतीचे ऐतिहासिक दागिने चोरले होते.
पॅरिसच्या अभियोक्ता कार्यालयाने रविवारी सांगितलं की, शनिवारी संध्याकाळी तपासकर्त्यांनी कारवाई केली. देश सोडण्याच्या तयारीत असताना एकाला पॅरिस चार्ल्स डी गॉल विमानतळावर अटक करण्यात आली.
फ्रेंच मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघेही ३० वर्षांचे आहेत आणि त्यांचं नाव आधीच पोलीस रेकॉर्डमध्ये आहे. डीएनए सँपलद्वारे एका संशयिताची ओळख पटवण्यात आली आहे, तर घटनास्थळावरून सुमारे १५० फॉरेन्सिक नमुने गोळा करण्यात आले आहेत.
गेल्या रविवारी सकाळच्या वेळेस फक्त आठ मिनिटांत चोरांनी अंदाजे ८८ मिलियन युरो (सुमारे १०२ मिलियन डॉलर्स) किमतीचे दागिने चोरले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरांनी बास्केट लिफ्टचा वापर करून म्युझियमच्या भिंतीवर चढून खिडकी तोडली, डिस्प्ले केस फोडली आणि दागिने घेऊन पळ काढला.
चोरीशी संबंधित गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या विशेष पोलीस युनिटकडून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. पॅरिसच्या अभियोक्ता लॉरे बेक्कुआ यांनी एका निवेदनात म्हटलं आहे की, माहिती वेळेआधी लीक झाल्यामुळे तपासात अडथळा येऊ शकतो. १०० हून अधिक तपासकर्ते चोरीचे दागिने परत मिळवण्यासाठी आणि सर्व गुन्हेगारांना पकडण्यासाठी काम करत आहेत.