Crime News : आईवर संशय घेणाऱ्या पित्याचा मुलांनी केला खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 00:15 IST2022-04-11T00:15:27+5:302022-04-11T00:15:55+5:30
Crime News: पत्नी व दोन मुलांना अटक

Crime News : आईवर संशय घेणाऱ्या पित्याचा मुलांनी केला खून
पाचोरा जि. जळगाव : आईच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पित्याचा दोन मुलांनीच चाकूचे सपासप वार करुन खून केला. ही थरारक घटना पाचोरा येथील भास्कर नगरात रविवारी पहाटे घडली. या प्रकरणी पत्नी व दोन्ही मुलांना अटक करण्यात आली आहे.
संजय बंकट खेडकर (४४) असे या खून झालेल्या इसमाचे नाव आहे. त्याचे इलेक्ट्रॉनिक्स दुरुस्तीची दुकान होते. वंदना खेडकर (४३), प्रतीक संजय खेडकर (२३) आणि मनोज संजय खेडकर (२१) अशी अटक करण्यात आलेल्या आई व दोन मुलांची नावे आहेत. संजय हा पत्नीवर संशय घेत होता. या कारणावरून दोघांमध्ये वारंवार खटके उडत होते. शनिवारी पती- पत्नीत रात्रभर भांडणे झाली. हा प्रकार दोन्ही मुलांसमोर घडला. रविवारी भल्या पहाटे वंदना हीने दोन्ही मुलांच्या मदतीने पतीवर वरच्या रूममध्ये चॉपर व तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करून त्याचा खून केला.
रविवारी दुपारी दोन्ही मुले वडिलांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहचली. तिथे पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांमुळे ही मुले गांगरली आणि त्यावेळी या खुनाचा उलगडा झाला. संजय याचा मृतदेह जळगाव येथे उत्तरीय तपासणीसाठी रवाना करण्यात आला आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिसात उशिरा गुन्ह्याची नोंद करण्याचे काम सुरू होते. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल मोरे करीत आहे.