Gang Rape in Palghar: पालघरच्या सातपाटीत महाराष्ट्राला हादरवणारी घटना; अल्पवयीन मुलीवर ११ जणांचा बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2022 07:22 IST2022-12-18T07:01:49+5:302022-12-18T07:22:10+5:30
पाच जणांना अटक, सहा तरुण फरार. पालघरमधील अनेक समुद्रकिनाऱ्यावर सायंकाळनंतर शुकशुकाट असतो. येथील सुरूची बने, झुडपांत नशेबाजांचा वावर असतो.

Gang Rape in Palghar: पालघरच्या सातपाटीत महाराष्ट्राला हादरवणारी घटना; अल्पवयीन मुलीवर ११ जणांचा बलात्कार
लाेकमत न्यूज नेटवर्क
पालघर : माहीम येथील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ११ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पाच तरुणांना सातपाटी सागरी पोलिसांनी अटक केली असून अन्य सहा तरुणांचा शोध पोलिस घेत आहेत. या प्रकरणाने पालघरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
सातपाटी सागरी पोलिस स्टेशनअंतर्गत असलेल्या माहीम चौकी दूरक्षेत्रातील माहीम पानेरीजवळ एका निर्जन ठिकाणी माहीम येथे राहणाऱ्या एका १६ वर्षीय मुलीवर ११ तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी तरुणांपैकी अनेक तरुण हे गर्दच्या आहारी गेल्याची माहितीही समोर येत आहे.
या मुलीवर जबरदस्ती करण्यात आल्यानंतर त्या मुलीने माहीम पोलिस चौकी गाठत या तरुणांविरुद्ध तक्रार दाखल केली. यानंतर सातपाटी सागरी पोलिस स्टेशनमध्ये पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पालघरचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली.
ही मुले माहीम, हनुमानपाडा, टेम्भी, सफाळे, वडराई भागातील असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचा तपास सुरू आहे.
किनाऱ्यालगतच्या शुकशुकाटाचा धोका
पालघरमधील अनेक समुद्रकिनाऱ्यावर सायंकाळनंतर शुकशुकाट असतो. येथील सुरूची बने, झुडपांत नशेबाजांचा वावर असतो. एकट्या-दुकट्या व्यक्तीला गाठून लुटण्याच्या घटनाही येथे घडल्या आहेत त्यामुळे गस्त वाढवावी, नशेबाजांवर कारवाई करावी अशी मागणी यापूर्वीही ग्रामस्थांनी केली होती. त्यांना व्यसनांसाठी पदार्थ कोठून मिळतात हा प्रश्नही उपस्थित झाला होता.