कोरोना नियम तर डावललेच पण लग्नातील वधूही निघाली अल्पवयीन; बालविवाहाची झाली पोलखोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 19:47 IST2021-03-18T19:46:11+5:302021-03-18T19:47:21+5:30

Child Marriage : बालविवाह प्रकरणात सहा जणांवर गुन्हा दाखल

The Corona rules were broken, but the bride also minor; The child marriage was over | कोरोना नियम तर डावललेच पण लग्नातील वधूही निघाली अल्पवयीन; बालविवाहाची झाली पोलखोल 

कोरोना नियम तर डावललेच पण लग्नातील वधूही निघाली अल्पवयीन; बालविवाहाची झाली पोलखोल 

ठळक मुद्देखंडाळात कारवाई : रोखायला गेले कोरोना, सापडला बालविवाह

यवतमाळ: दुर्गम ठिकाणी एका मंदिरात कोरोनाचे नियम डावलून लग्न लावले जात आहे, अशी गुप्त खबर प्रशासनाला मिळाली. त्यावरून कारवाईसाठी धडकलेल्या अधिकाऱ्यांपुढे भलताच प्रकार आला. कोरोनाचे नियम तर डावलले गेलेच, पण लग्नातील नवरी मुलगीही अल्पवयीन निघाली. त्यामुळे या प्रकरणात गर्दी करणे व अल्पवयीन मुलीचा विवाह लावणे आदी बाबीसंदर्भात सहा जणांवर खंडाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

यवतमाळ आणि हिंगोली जिल्ह्याच्या सीमा भागात मंगळवारी हा प्रकार घडला. पांढुर्णा गावातील एका मंदिरात बालविवाह होत असल्याची माहिती हिंगोली जिल्हा बाल संरक्षण कक्षाला मिळाली. त्या आधारे त्यांचे अधिकारी व हिंगोली पोलीस यांनी विवाहस्थळ गाठले. मात्र तोपर्यंत विवाह संपन्न झाला. घटना यवतमाळ जिल्ह्याच्या हद्दीत घडल्याने पुसद तालुक्यातील खंडाळा पोलिसांना माहिती देण्यात आली. यवतमाळ जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू यांच्या मार्गदर्शनात खंडाळाचे ठाणेदार गोपाल चावडीकर व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर घटनास्थळी पोहोचले. ग्रामसेवक पांडुरंग बुरकुले यांनी फिर्याद दिल्यानंतर यात ३० वर्षीय नवरदेव, लग्न जुळविणारे व लग्न लावून देणारे अशा व्यक्तींवर बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार तसेच कोरोना काळात गर्दी जमविल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईसाठी यवतमाळ बाल संरक्षण कक्षाचे महेश हळदे, माधुरी पावडे, सुनिल बोकसे, हिंगोली येथील बालसंरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी सहकार्य केले.

Web Title: The Corona rules were broken, but the bride also minor; The child marriage was over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.