रस्त्यावरील घाण पाणी उडवल्याने वाद; मर्सिडीज चालकाने चौघांना चिरडले, महिलेचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 20:29 IST2022-12-22T20:28:37+5:302022-12-22T20:29:14+5:30
आरोपीविरोधात भादंवि कलम 302 आणि 307 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

रस्त्यावरील घाण पाणी उडवल्याने वाद; मर्सिडीज चालकाने चौघांना चिरडले, महिलेचा मृत्यू
हैदराबाद: हैदराबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून एका कार चालकाने चौघांना चिरडल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी झाले. सायबराबाद आयुक्तालयाअंतर्गत येणाऱ्या रायदुर्गम पोलिस स्टेशन परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एक मर्सिडीज बेंझ कार रस्त्यावरुन वेगाने जात होती. यादरम्यान रस्त्याचे घाण पाणी दुचाकीवरुन जाणाऱ्या दोघांच्या अंगावर पडले. यानंतर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पुढे जाऊन मर्सिडीज कार थांबवण्याचा प्रयत्न केला. पण, कार चालकाने कार थांबवण्याऐवजी भरधाव वेगाने दुचाकीस्वारांना उडवले.
दोन्ही दुचाकींवर प्रत्येकी दोन जण होते. सर्वजण गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिथे एका महिलेचा मृत्यू झाला तर तिचा पती रुग्णालयात जीवन-मरणाची लढाई करत आहे. सोबतच उर्वरित दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रायदुर्गम पोलिसांनी तक्रार मिळाल्यानंतर मर्सिडीज बेंझ कार ओळखली आणि जप्त केली. तसेच, आरोपी राजासिम्हा रेड्डी (26) याला अटक केली आणि त्याच्याविरुद्ध भादंवि कलम 302 आणि 307 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.