आमदाराने पोलिसांना शिविगाळ केल्याची क्लिप व्हायरल; पोलीस अधीक्षक म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 22:05 IST2021-09-28T21:57:47+5:302021-09-28T22:05:21+5:30
Clip of MLAs abusing police goes viral : ही क्लिप खाजगी व्यक्तींमध्ये झालेले संभाषण पोलिसास शिविगाळ केली नसल्याचे स्पष्टीकरण पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी दिले आहे.

आमदाराने पोलिसांना शिविगाळ केल्याची क्लिप व्हायरल; पोलीस अधीक्षक म्हणतात...
हिंगोली : कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी पोलिसांना उद्देशून केलेल्या शिविगाळीची क्लिप व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यात आमदारांवर कारवाईची मागणी केली जात आहे. मात्र ही क्लिप खाजगी व्यक्तींमध्ये झालेले संभाषण पोलिसास शिविगाळ केली नसल्याचे स्पष्टीकरण पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी दिले आहे.
कळमनुरीचे आमदार कायम खळबळजनक वक्त्यव्य करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. यामुळे ते कायम प्रसिद्धीच्या झोतात असतात. मात्र पोलीस अधिकाऱ्यास शिवराळ भाषेत शिविगाळ केल्याची क्लिप व्हायरल झाली अन् समाज माध्यमांवर यावरून संतापाची लाट उसळली आहे. अनेकांनी या वक्त्यव्यावरून कारवाईची अपेक्षा व्यक्त केली आहे. यामुळे पोलीस प्रशासनाकडेही विचारणा केली जात आहे. या क्लिपमधील भाषा ही एका लोकप्रतिनिधीला शोभणारी नसल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. यावरून अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
याबाबत विचारले असता पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी मात्र व्हायरल होत असलेल्या क्लिपबाबत चौकशी केली असता तसे काही निष्पन्न झाले नसल्याचे सांगितले. ही क्लिप चार महिन्यांपूर्वीची आहे. बावणखोली कोविड सेंटरनजीक एका मोटारसायकल चालकास ट्रकची धडक लागली होती. त्यात मोटारसायकलचालकाने ट्रकचालकास फोन दिल्यानंतरचे हे संभाषण आहे. या ठिकाणी कोणीही पोलीस हजर नव्हता. याबाबत कुणी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यानेही काही तक्रार केली नाही. ती केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
याबाबत आ.संतोष बांगर म्हणाले, यात पोलिसांच्या मदतीनेच एका गरीब अपघातग्रस्ताला न्याय मिळवून दिला आहे. अपघातानंतरही ट्रकचालकाने संबंधिताला मदत करायची सोडून गुन्हा दाखल करायची धमकी दिली होती. यात पोलिसाचा अवमान करायचा काही हेतू नव्हता.