"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 18:50 IST2025-11-10T18:50:03+5:302025-11-10T18:50:43+5:30
एका महिलेने घरगुती वादातून तिच्या ४३ वर्षीय पतीची हत्या करून मृतदेह सुटकेसमध्ये भरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

AI फोटो
छत्तीसगडच्या जशपूर जिल्ह्यात एका महिलेने घरगुती वादातून तिच्या ४३ वर्षीय पतीची हत्या करून मृतदेह सुटकेसमध्ये भरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील दुलदुला पोलिस स्टेशन हद्दीतील भिंजपूर गावातील एका घरात असलेल्या सुटकेसमध्ये संतोष भगतचा मृतदेह सापडला.
संतोषचा मोठा भाऊ विनोदने रविवारी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. विनोदने सांगितलं की, संतोषची पत्नी मुंबईत काम करते आणि अधूनमधून गावी येते आणि काही दिवसांपूर्वीच ती गावी परतली होती. ७ नोव्हेंबर रोजी या जोडप्यामध्ये कशावरून तरी जोरदार वाद झाला होता. संतोषच्या पत्नीने ८ नोव्हेंबर रोजी तिच्या एका मुलीला फोन करून सांगितलं की तिने तिच्या पतीची हत्या केली आहे.
"मी तुझ्या बापाला मारलं आणि मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून सुटकेसमध्ये भरला आहे" असं सांगितलं. यानंतर मुलगी घाबरून रविवारी तिच्या पतीसोबत भिंजपूर गावात परतली आणि तिचे काका विनोद यांना भयंकर घटनेची माहिती दिली, त्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, विनोदच्या माहितीवरून, गावात पोलिसांचं पथक पाठवण्यात आले आणि संतोषच्या घरी झडती घेण्यात आली.
तपासा दरम्यान, पोलिसांना सुटकेसमध्ये संतोषचा मृतदेह सापडला. नंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. जशपूर जिल्हा पोलीस अधीक्षक शशी मोहन सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे आणि आरोपी पत्नीचा शोध सुरू केला आहे. पत्नीला अटक करण्यासाठी पोलिसांचं पथक महाराष्ट्रात पाठवण्यात आलं आहे आणि लवकरच तिला अटक केली जाईल.