Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 13:18 IST2025-07-19T13:15:44+5:302025-07-19T13:18:41+5:30
Changur Baba : छांगुर बाबाच्या बेकायदेशीर व्यवसायाचं नेटवर्क फक्त देशापुरतं मर्यादित नाही तर ते आंतरराष्ट्रीय स्तरावर पसरलं होतं.

Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा
जमालुद्दीन उर्फ छांगुर बाबाच्या बेकायदेशीर व्यवसायाचं नेटवर्क फक्त देशापुरतं मर्यादित नाही तर ते आंतरराष्ट्रीय स्तरावर पसरलं होतं. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) तपासात हे उघड झालं आहे. ईडीने मुंबई ते पनामापर्यंत पसरलेल्या मनी लाँड्रिंग नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे.
तपासात असं समोर आलं की, छांगुर बाबाला परदेशातून मोठं फंडिंग मिळालं होतं. या फंडिंगचा वापर देशातील लोकांचं धर्मांतर करण्यासाठी आणि बेकायदेशीर मालमत्ता खरेदी करण्यासाठी केला जात होता. छांगुर बाबा आणि त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांच्या २२ बँक खात्यांच्या चौकशीत ईडीला तब्बल ६० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंगचे पुरावे सापडले आहेत. खात्यांमध्ये संशयास्पद व्यवहारांची एक मोठी यादी सापडली आहे, ज्याचा सोर्स आणि उद्देश संशयास्पद आहे.
मुंबईत छांगुर बाबाने 'रुनवाल ग्रीन्स' नावाचं कॉम्प्लेक्स खरेदी केलं होतं. ईडीला संशय आहे की, हा व्यवहार बेकायदेशीर फंडिंगमधून मिळालेल्या पैशाने झाला होता. या व्यवहाराशी संबंधित कागदपत्रांची कसून चौकशी केली जात आहे. ईडीच्या तपासात असंही समोर आलं आहे की, छांगुर हा पनामा येथील 'लोगोस मरीन' नावाच्या कंपनीशी जोडलेला आहे. ईडीने या कंपनीचे कागदपत्रे आणि रेकॉर्ड ताब्यात घेतले आहेत, ज्यामुळे मनी लाँड्रिंगचं नेटवर्क परदेशातही चालवलं जात असल्याचा संशय निर्माण होतो.
ईडीने लखनौच्या सुभाष नगरमध्ये असलेल्या 'आस्वी बुटीक'चीही झडती घेतली आहे. तपासात असं दिसून आलं आहे की, बेकायदेशीर मालमत्तेशी संबंधित कागदपत्रं लपविण्यासाठी हे बुटीक एक अड्डा बनवलं गेलं होतं. छांगुर बाबा आणि त्याच्या नेटवर्कशी संबंधित अनेक मालमत्तांची कागदपत्रं येथून जप्त करण्यात आली आहेत. सध्या बुटीक सील करण्यात आले आहे.
ईडीने आपल्या तपासात नवीन रोहरा आणि नीतू रोहरा उर्फ नसरीन यांनाही या मनी लाँड्रिंग नेटवर्कचा महत्त्वाचा भाग मानलं आहे. हे दोघेही संशयास्पद व्यवहार आणि मालमत्तेच्या व्यवहारात छांगुर बाबाला मदत करत होते. त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई देखील करण्यात आली आहे. छांगुर बाबा आणि त्याच्या नेटवर्कविरुद्ध ईडीकडे अनेक पुरावे आहेत. आता या पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल.