“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 13:54 IST2026-04-04T13:53:44+5:302026-04-04T13:54:31+5:30
महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर परिसरात एक खळबळजनक घटना समोर आली आहे.

फोटो - आजतक
महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर परिसरात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका तरुणाने आपल्या 'लिव्ह-इन पार्टनर'ची मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून हत्या केली आणि त्यानंतर या घटनेला आत्महत्येचं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. मात्र घटनेच्या सुमारे २० दिवसांनंतर आलेल्या शवविच्छेदन अहवालाने या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकेश योगेश बहिरवार असं आरोपीचं नाव आहे. प्रियंका असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. हे दोघेही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. प्रियंका आपल्या पतीपासून वेगळी राहत होती. याच काळात तिची भेट अंकेशशी झाली, जो तिच्यापेक्षा वयाने सात वर्षांनी लहान होता. हळूहळू दोघांमधील जवळीक वाढली आणि ते दुर्गापूर येथील प्रियंकाच्या घराच्या वरच्या मजल्यावर एकत्र राहू लागले. सुरुवातीला सर्व काही सुरळीत होतं, परंतु नंतर छोट्या-छोट्या गोष्टींवरून त्यांच्यात वारंवार भांडणं होऊ लागली होती.
"प्रियंका बोलत नाही, ती बेशुद्ध झाली”
१४ मार्चच्या रात्री अंकेशने प्रियंकाच्या वडिलांना फोन केला आणि सांगितलं की, "प्रियंका बोलत नाही, ती बेशुद्ध झाली आहे. कदाचित तिने आत्महत्या केली असावी." जेव्हा कुटुंबातील सदस्य वरच्या मजल्यावर गेले, तेव्हा प्रियंका बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. सुरुवातीला ही आत्महत्या वाटत होती, पण गुरुवारी आलेल्या शवविच्छेदन अहवालाने सत्य बाहेर आणलं. या अहवालानुसार, तिचा मृत्यू गळा आवळल्यामुळे झाल्याचं स्पष्ट झालं.
हत्या केल्याचं केलं कबूल
२० दिवसांनंतर आलेल्या या अहवालामुळे प्रियंकाचा मृत्यू आत्महत्या नसून हत्या असल्याचं सिद्ध झालं. त्यानंतर पोलिसांनी अंकेशला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, त्याने आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी घटनास्थळावरून हत्येसाठी वापरलेली मोबाईल चार्जरची वायर आणि एक्स्टेंशन बोर्ड देखील जप्त केला आहे. आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.