लोकलच्या दिव्यांग डब्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2018 15:35 IST2018-12-19T15:33:35+5:302018-12-19T15:35:25+5:30
अल्पवयीन पीडित मुलीने घडलेला प्रकार आपल्यासोबत असलेल्या वडिलांना सांगितला आणि भामट्या विशाल सिंगला (वय २४) रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. पॉक्सो कायद्यान्वये आरोपी विशाल सिंगला दादर रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.

लोकलच्या दिव्यांग डब्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास बेड्या
मुंबई - दादर रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेल्वे लोकलच्या दिव्यांग डब्यात एका १५ वर्षीय अंध मुलीचा विनयभंग करण्यात आला. हा धक्कादायक प्रकार कल्याणला जाणाऱ्या लोकलमध्ये घडला. मात्र, अल्पवयीन पीडित मुलीने घडलेला प्रकार आपल्यासोबत असलेल्या वडिलांना सांगितला आणि भामट्या विशाल सिंगला (वय २४) रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. पॉक्सो कायद्यान्वये आरोपी विशाल सिंगला दादर रेल्वे पोलिसांनीअटक केली आहे.
१७ डिसेंबर रोजी १५ वर्षीय अंध मुलगी आपल्या वडिलांसोबत लोकलने दिव्यांग डब्यातून प्रवास करत होती. ही मुलगी ब्रेल लिपी ६ वी इयत्तेत शिकते. मात्र, दादर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर आलेल्या कल्याण लोकलमध्ये त्यांच्या डब्यात एक तरुण चढला आणि त्याने अंध मुलीला पाठीमागून अश्लील स्पर्श करू लागला. त्यानंतर पीडित मुलीने भामट्या तरुणाचे बोट पकडून घडलेला प्रकार वडिलांना सांगितला. याबाबत तिच्या वडिलांनी जाब विचारला असता त्याने वाद घालण्यास सुरुवात केली. मुलीच्या वडिलांना त्याने धक्काबुक्की केली. त्यावेळी त्यास इतर प्रवाशांच्या मदतीने माटुंगा रेल्वे स्थानकावर उतरून ड्युटीवरील हजर असलेल्या पोलिसांच्या ताब्यात दिले.पोलीसांनी त्या भामट्याला दादर रेल्वे पोलीस ठाण्यात आणले. यावेळी फिर्यादी वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून आपल्या मुलीचा विनयभंग केल्याबाबत दादर रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. भा. दं. वि. कलम 354,(अ) सह लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा 2012 चे (पॉक्सो) कलम 8, भारतीय रेल्वे कायदा कलम 147, 155 (ब) या कायद्यांतर्गत आरोपी विशाल सिंगला पोलिसांनी अटक केली आहे. विशाल हा मुलुंड येथे राहतो आणि तो विनातिकीट दिव्यांग नसून त्यांच्या डब्यातून प्रवास करत होता असल्याचं पोलीस तपासत निष्पन्न झालं.