जयपूरमध्ये कारचं मृत्यूतांडव! रेसिंगच्या नादात १६ जणांना चिरडलं; एकाचा जागीच मृत्यू, शहरात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 09:36 IST2026-01-10T09:35:27+5:302026-01-10T09:36:36+5:30
या भीषण अपघातात १६ जण जखमी झाले असून एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे.

जयपूरमध्ये कारचं मृत्यूतांडव! रेसिंगच्या नादात १६ जणांना चिरडलं; एकाचा जागीच मृत्यू, शहरात खळबळ
राजस्थानातील जयपूरमध्ये शुक्रवारी रात्री एक अत्यंत भीषण अपघात घडला. वेगाची नशा आणि मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणांच्या एका कारने रस्त्याकडेला उभ्या असलेल्या निष्पाप लोकांना अक्षरशः चिरडले. या भीषण अपघातात १६ जण जखमी झाले असून एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. कारचा वेग इतका प्रचंड होता की, तिने रस्त्यावरील १० हून अधिक हातगाड्या आणि ठेल्यांना उडवत थेट झाडाला धडक दिली.
नेमकं काय घडलं?
हा अपघात शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास मानसरोवर परिसरातील पत्रकार कॉलनीजवळ घडला. मुहाना पोलीस ठाण्याचे अधिकारी गुरु भूपेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक पांढऱ्या रंगाची कार दुसऱ्या एका कारसोबत शर्यत लावत अत्यंत वेगाने येत होती. आधी ही कार दुभाजकाला धडकली आणि त्यानंतर तिचे नियंत्रण सुटले. अनियंत्रित झालेली ही कार रस्त्याकडेला जेवण करणाऱ्या आणि उभे असलेल्या १६ लोकांना धडकली.
१० हातगाड्यांचा चुराडा, परिसरात रक्ताचा सडा
कारने रस्त्याकडेला उभे असलेले लोक आणि हातगाड्यांना जोरदार धडक दिली. यामुळे तिथे जेवण करणाऱ्या लोकांची मोठी धावपळ उडाली. ऑडी कारने १६ जणांना उडवल्यानंतर ती एका झाडाला धडकून थांबली. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून त्याची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. जखमींपैकी १० जणांना तातडीने सवाई मानसिंग रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.
दोन आरोपींना जमावाने चोपले
अपघातानंतर कारमधील चार तरुण अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले, मात्र दोघांना स्थानिक नागरिकांनी पकडले. हे दोघेही तरुण नशेच्या धुंदीत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. संतप्त जमावाने या दोघांनाही चांगलाच चोप दिला आणि त्यानंतर पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी कार जप्त केली असून पसार झालेल्या इतरांचा शोध सुरू आहे.
VIDEO | Jaipur: Visuals of the luxury car, currently parked at a police station, that ploughed into pedestrians near Kharabas Circle in Jaipur's Patrakar Colony area on Friday night, killing one person and injuring 15 others.#JaipurNews#jaipuraccident
— Press Trust of India (@PTI_News) January 10, 2026
(Full video available… pic.twitter.com/lhdHB1xbsd
मंत्र्यांची रुग्णालयात धाव
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री प्रेमचंद बैरवा, वैद्यकीय मंत्री गजेंद्र सिंह खिवसर आणि आमदार गोपाल शर्मा यांनी रात्रीच सवाई मानसिंग रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.