लंडनहून भारतात आला, ६ दिवस गुपचूप गोठ्यात लपला अन्...; फॉरेन रिटर्न लेकानेच आईला संपवलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 12:31 IST2026-01-12T12:29:36+5:302026-01-12T12:31:12+5:30
ज्या माऊलीने मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्याला सात समुद्रपार लंडनला पाठवलं, त्याच पोटच्या गोळ्याने आईला संपवलं.

लंडनहून भारतात आला, ६ दिवस गुपचूप गोठ्यात लपला अन्...; फॉरेन रिटर्न लेकानेच आईला संपवलं!
ज्या आईने बोट धरून चालायला शिकवलं, ज्या माऊलीने मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्याला सात समुद्रपार लंडनला पाठवलं, त्याच पोटच्या गोळ्याने आईचा जीव घेतल्याची सुन्न करणारी घटना हरियाणातील यमुनानगरमध्ये उघडकीस आली आहे. यमुनानगरच्या श्यामपूर गावातील सरपंचाची पत्नी बलजिंदर कौर यांच्या हत्येचा उलगडा झाला असून, ही हत्या दुसऱ्या कोणी नसून त्यांच्याच एकुलत्या एक मुलाने, गोमित राठीने केल्याचे समोर आले आहे.
लंडनमध्ये रचला खुनाचा कट
गोमित राठी हा लंडनमध्ये 'स्टडी व्हिसा'वर शिक्षण घेत होता. मात्र, त्याचे एका दुसऱ्या जातीतील मुलीशी प्रेमसंबंध होते. आई बलजिंदर कौर यांचा मुलाच्या या लग्नाला कडाडून विरोध होता. आईच्या याच विरोधामुळे गोमितच्या मनात सूडाची आग जळत होती. त्याने लंडनमध्ये असतानाच आईला वाटेतून हटवण्याची योजना आणखी आणि तो १८ डिसेंबरला कोणालाही न सांगता गुपचुप भारतात परतला.
६ दिवस गोठ्यात लपून राहिला!
भारतात आल्यानंतर गोमित आपल्या घरी गेला नाही. तो आपल्या पंकज नावाच्या मित्राच्या मदतीने तब्बल सहा दिवस गावातीलच एका जनावरांच्या गोठ्यात लपून बसला. आपल्या आईला मारण्याची योग्य संधी तो शोधत होता. या सहा दिवसांत त्याचा मित्र त्याला जेवण आणि घरच्या हालचालींची माहिती पुरवत होता. ज्या मुलाची आई वाट पाहत होती, तोच मुलगा घराशेजारील गोठ्यात आणि जनावरांच्यामध्ये बसून आईच्या मृत्यूचा काळ मोजत होता.
ती काळरात्र अन् क्रूरतेचा कळस
२४ डिसेंबरच्या रात्री जेव्हा बलजिंदर कौर घरी एकट्या होत्या, तेव्हा गोमितने घरात प्रवेश केला. त्याने आईशी वाद घातला आणि रागाच्या भरात बेदम मारहाण करत स्वतःच्या हाताने आईचा गळा आवळला. आईचा जीव गेल्याची खात्री पटल्यानंतर, हा अपघात वाटावा यासाठी त्याने आईचा मृतदेह घरातल्याच पाण्याच्या टाकीत फेकून दिला. त्याला वाटलं की पोलीस याला बुडून झालेला मृत्यू समजतील, पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं.
असा उघड झाला खूनी खेळ
सुरुवातीला हा अपघाती मृत्यू वाटत होता, पण क्राइम ब्रँचला संशय आला. पोलिसांनी गोमितच्या मोबाईलचे लोकेशन तपासले असता धक्कादायक माहिती समोर आली. गोमितचे लोकेशन लंडनऐवजी यमुनानगरमध्येच दाखवत होते. तांत्रिक पुरावे आणि कॉल डिटेल्सच्या आधारे पोलिसांनी गोमित आणि त्याचा मित्र पंकजला ताब्यात घेतले. पोलिसांनी कडक चौकशी करताच गोमित कोलमडला आणि त्याने आपला गुन्हा कबूल केला. पोलीस कोठडीत रवानगी सध्या आरोपी मुलगा गोमित आणि त्याचा मित्र पंकज ४ दिवसांच्या पोलीस कोठडीत आहेत.