बुरखा, ओठांवर लिपस्टिक अन् टक्कल; अत्याचार करुन वृंदावनमध्ये लपलेल्या आरोपीला पोलिसांनी शोधून काढलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 15:50 IST2025-12-31T14:48:14+5:302025-12-31T15:50:18+5:30
राजस्थानातून पळून गेलेल्या आरोपीला पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली.

बुरखा, ओठांवर लिपस्टिक अन् टक्कल; अत्याचार करुन वृंदावनमध्ये लपलेल्या आरोपीला पोलिसांनी शोधून काढलं
Rajasthan Crime: स्वतःला पोलीस अधिकारी सांगून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या एका नराधमाला धौलपूर पोलिसांनी उत्तर प्रदेशातील वृंदावन येथून अटक केली आहे. राजेंद्र सिंह सिसोदिया असे या ५० वर्षीय आरोपीचे नाव असून, अटक टाळण्यासाठी तो चक्क महिलांचा वेष धारण करुन फिरत होता. आरोपी बुर्का आणि लिपस्टिक लावून लपून बसला होता. पोलिसांनी या आरोपीला बेड्या ठोकून शहरातून त्याची धिंड काढली आहे.
नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार
ही संतापजनक घटना १५ डिसेंबर रोजी घडली. आरोपी राजेंद्र सिसोदिया याने एका १६ वर्षीय मुलीला रेल्वे पोलीस दलात नोकरी देण्याचे आणि तिचे हॉल तिकीट देण्याचे आमिष दाखवून आपल्या घरी बोलावले होते. मुलगी आपल्या लहान भावासोबत तिथे पोहोचली. मात्र, नराधम राजेंद्रने कागदपत्रांच्या झेरॉक्सच्या बहाण्याने भावाला घराबाहेर पाठवले आणि एकट्या सापडलेल्या मुलीवर अत्याचार केले. पीडितेने आरडाओरडा केल्यावर लोक जमा झाले, पण आरोपी तिथून दुचाकीवरून पसार झाला.
बुर्का आणि लिपस्टिकचा बनाव
गुन्हा केल्यानंतर आरोपी आपली ओळख लपवण्यासाठी सतत ठिकाणे बदलत होता. तो कधी ट्रॅकसूट तर कधी जॅकेट घालून फिरत असे. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्याने टक्कले केले आणि वृंदावनमध्ये तो चक्क बुर्का घालून महिलांच्या वेशात राहू लागला. इतकेच नाही तर त्याने आपली ओळख पूर्णपणे लपवण्यासाठी ओठांवर लिपस्टिकही लावली होती. मात्र, पोलिसांनी तांत्रिक तपास आणि सीसीटीव्हीच्या आधारे त्याचा पाठलाग सुरू ठेवला. वृंदावनमध्ये महिलांच्या वेशात असलेल्या एका महिलेची वागणूक संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला पकडले. जेव्हा त्याचा बुरखा हटवला, तेव्हा स्वतः पोलीसही चक्रावून गेले.
गुन्हेगारी पार्श्वभूमी
राजेंद्र सिसोदिया हा मूळचा आरएसी बटालियनचा जवान होता. मात्र, त्याच्यावर यापूर्वीच पॉक्सो, अपहरण आणि मारहाणीसारखे ५ गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. तो स्वतःला निवृत्त डीएसपी किंवा पोलीस इन्स्पेक्टर सांगून मुलींना जाळ्यात ओढायचा. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी त्याच्यावर १० हजारांचे बक्षीस जाहीर केले होते. काही दिवसांपूर्वी नगर परिषदेने त्याच्या घराच्या बेकायदेशीर बांधकामावर बुलडोझर चालवून कारवाई केली होती.
पोलिसांनी काढली धिंड
आरोपीला अटक केल्यानंतर धौलपूर पोलिसांनी त्याची शहरातून धिंड काढली. ज्या रस्त्यावरून तो बुरखा घालून पळत होता, त्याच रस्त्यावरून पोलिसांनी त्याला लोकांसमोर फिरवले.