नशेत असलेल्या भाजपा नेत्याची गुंडगिरी; महिलेवर अत्याचार, Video व्हायरल झाल्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 15:33 IST2026-01-29T15:32:45+5:302026-01-29T15:33:40+5:30
भाजपा नेते पुलकित टंडन यांनी घरात घुसून मारहाण केल्याचा आणि मानसिक छळ केल्याचा आरोप महिलेने केला आहे.

फोटो - आजतक
मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील नागौद येथून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. सत्ताधारी पक्षाच्या एका नेत्यावर महिलेशी अमानुष कृत्य केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. नागौदचे भाजपा नेते पुलकित टंडन यांनी घरात घुसून मारहाण केल्याचा आणि मानसिक छळ केल्याचा आरोप महिलेने केला आहे. या संपूर्ण घटनेचा एक सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रात्री उशिरा घडली. आरोपीने महिलेच्या घराच्या परिसरात प्रवेश केला. व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, लोखंडी सळईच्या गोदामासारख्या ठिकाणी एका महिलेशी कशा प्रकारे गैरवर्तन केले जात आहे. तक्रारीत म्हटलं आहे की, भाजपा नेता पुलकित टंडन याने केवळ शिवीगाळच केली नाही, तर तिला मारहाण करून बराच वेळ छळलं. आरोपी आपल्या राजकीय पदाचा आणि प्रभावाचा गैरवापर करून आपल्याला बऱ्याच काळापासून त्रास देत असल्याचा आरोपही महिलेने केला आहे.
घटनेनंतर घाबरलेल्या महिलेने हिंमत एकवटून नागौद पोलीस ठाणे गाठलं आणि आरोपी नेत्याविरुद्ध लेखी तक्रार दाखल केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. महिलांच्या सन्मानाच्या गप्पा मारणाऱ्या भाजपचे नेते आता सत्तेच्या नशेत महिलांची सुरक्षा वाऱ्यावर सोडत आहेत का? असा सवाल विरोधी पक्ष आणि जनतेतून विचारला जात आहे.
नागौद पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी पुलकित टंडन विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एएसपी (ASP) प्रेमलाल कुर्वे यांनी सांगितलं की, सीसीटीव्ही फुटेज आणि महिलेच्या जबाबाच्या आधारे कारवाई करण्यात आली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजप जिल्हा कार्यालयानेही एक पत्र जारी केले आहे. यामध्ये आरोपी नेत्याला एका आठवड्याच्या आत स्पष्टीकरण देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.