भाजपा नेत्याच्या कारने ५ जणांना चिरडलं; जमावाने पकडलं, मात्र पोलिसांच्या तावडीतून आरोपी फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 11:51 IST2025-12-27T11:51:11+5:302025-12-27T11:51:45+5:30
एका कारने रस्त्याच्या कडेला बसलेल्या लोकांना चिरडलं. ही कार दीपेंद्र भदौरिया चालवत होता.

भाजपा नेत्याच्या कारने ५ जणांना चिरडलं; जमावाने पकडलं, मात्र पोलिसांच्या तावडीतून आरोपी फरार
मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यात पोरसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जोटई रोडवर काल रात्री एक भीषण अपघात झाला. एका कारने रस्त्याच्या कडेला बसलेल्या लोकांना चिरडलं. ही कार दीपेंद्र भदौरिया चालवत होता. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी दीपेंद्र भदौरिया हा भाजपा नेता असून अपघातावेळी गाडीचा वेग खूप जास्त होता.
थंडीपासून संरक्षण मिळवण्यासाठी जोटई रोड बायपास चौकाच्या कडेला एक लहान मुलगा आणि इतर चार लोक शेकोटी पेटवून बसले होते. त्याच वेळी भरधाव वेगाने आलेल्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. जखमींमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. यातील ३ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
जखमींना सर्वात आधी पोरसा येथे प्राथमिक उपचार देण्यात आले, त्यानंतर त्यांना मुरैना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं. प्रकृती अधिक गंभीर असल्याने अर्णव नावाचा मुलगा आणि इतर दोन जखमींना ग्वाल्हेर येथील रुग्णालयात रेफर करण्यात आलं आहे. घटनेनंतर मोठा गदारोळ अपघातानंतर वाटसरू आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.
संतापलेले नातेवाईक आणि ग्रामस्थांनी पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी कार चालक दीपेंद्र भदौरिया याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं होतं, मात्र धक्कादायक बाब म्हणजे तो भरबाजारात पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्यात यशस्वी झाला. आरोपी फरार झाल्याची बातमी समजताच नातेवाईक आणि ग्रामस्थांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी घटनास्थळी मोठा गोंधळ केला. पोलीस आता फरार आरोपीचा शोध घेत आहेत.