पर्यावरणाच्या ह्रासप्रकरणी भाजपा नेते नरेंद्र मेहतांच्या भावावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2021 17:49 IST2021-06-25T17:48:41+5:302021-06-25T17:49:08+5:30
मीरारोडच्या कनकीया परिसरातील ७११ क्लब इमारतीच्या मागील मौजे नवघर सर्व्हे क्रं. ५१, ६८, ६९ पैकी जमिनीवर २००५ च्या एमआरसॅक नकाशा नुसार कांदळवन ची झाडे होती

पर्यावरणाच्या ह्रासप्रकरणी भाजपा नेते नरेंद्र मेहतांच्या भावावर गुन्हा दाखल
मीरारोड - भाजप नेते तथा माजी आमदार नरेंद्र मेहता यांचे भाऊ विनोद मेहता यांच्यावर ७११ क्लब इमारतीमागील कांदळवनचा ऱ्हास केल्याप्रकरणी महापालिकेने मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. विनोद मेहता हे माजी महापौर डिंपल मेहता यांचे पती आहेत.
मीरारोडच्या कनकीया परिसरातील ७११ क्लब इमारतीच्या मागील मौजे नवघर सर्व्हे क्रं. ५१, ६८, ६९ पैकी जमिनीवर २००५ च्या एमआरसॅक नकाशा नुसार कांदळवन ची झाडे होती. सदर ठिकाणी ७११ हॉटेल्स प्रा ली ने असलेली कांदळवनची झाडे नष्ट करून भराव केला व लॉन तयार केले. तसेच कुंपण भिंती, पाथवे , रस्ता आदी कामे केली. कांदळवन नष्ट करून पर्यावरणाचा ऱ्हास केल्या प्रकरणी गेल्यावर्षी पालिकेने स्थळपाहणी करून अहवाल तयार केला होता.
महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्या मंजुरी नंतर प्रभाग अधिकारी कांचन गायकवाड यांनी फिर्याद देऊन मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ७११ हॉटेल्स प्रा ली चे संस्थापक आणि सर्वात मोठे भागधारक माजी आमदार नरेंद्र मेहता आहेत. तर सातबारा नोंदी संचालक म्हणून त्यांचा भाऊ विनोद मेहता आहे.
गुन्ह्यातील सर्वे क्रमांक हे ७११ क्लबच्या आवारातील असून सातत्याने कांदळवन नष्ट करून पर्यावरणाचा ऱ्हासकेल्या प्रकरणी या आधी देखील विनोद मेहता, प्रशांत केळुस्कर, रजनीकांत सिंह आदींवर गुन्हे दाखल आहेत. आता आणखी एक गुन्हा दाखल झाल्याने माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास हा मीरारोड पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय चव्हाण व त्यांचे पथक करत आहेत.