धक्कादायक! आईसह तीन चिमुकल्यांची अपहरणानंतर निर्घृण हत्या; परिसरात खळबळ...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 16:16 IST2026-01-15T16:15:45+5:302026-01-15T16:16:02+5:30
नदीकिनारी बांधलेल्या अवस्थेत आढळले चौघांचे मृतदेह!

धक्कादायक! आईसह तीन चिमुकल्यांची अपहरणानंतर निर्घृण हत्या; परिसरात खळबळ...
मुजफ्फरपूर : बिहारच्या मुजफ्फरपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अहियापूर पोलीस ठाणे हद्दीत एक महिला आणि तिच्या तीन लहान मुलांची अपहरणानंतर निर्घृण हत्या करण्यात आली. चंदवारा घाट पुलाखाली गंडक नदीच्या काठावर चौघांचे मृतदेह बांधलेल्या अवस्थेत आढळल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
घटनास्थळी मोठी गर्दी, पोलिसांचा तातडीने तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच, जिल्ह्याचे एसपी, एसडीपीओ तसेच अहियापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी रोहन कुमार यांनी घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला. मृतांमध्ये कृष्मोहन कुमार यांची ममता कुमारी(२२), त्यांचा ६ वर्षीय मुलगा आदित्य कुमार, ४ वर्षीय मुलगा अंकुश कुमार आणि दोन वर्षांची मुलगी कृती कुमारी यांचा समावेश आहे.
अपहरणानंतर हत्या केल्याचा नातेवाइकांचा आरोप
मृतांच्या नातेवाइकांनी चौघांचे अपहरण करून नंतर हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, १० जानेवारी रोजी अहियापूर पोलीस ठाण्यात ममता कुमारी व त्यांच्या तीन मुलांच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.
कृष्मोहन कुमार हे पेशाने ऑटोचालक असून ते बखरी सिपाहपूर येथील अमरेंद्र कुमार सिंह यांच्या घरात भाड्याने राहतात. १० जानेवारी रोजी पहाटे सुमारे पाच वाजता ते ऑटो चालवण्यासाठी झिरो माइल परिसरात गेले होते. सायंकाळी सहा वाजता घरी परतल्यावर त्यांच्या आईने सांगितले की, ममता कुमारी दुपारी तीनही मुलांना घेऊन बाजारात गेली होती, मात्र घरी परतली नाही.
धमकीचे फोन कॉल, पोलिसांचे दुर्लक्ष
बराच शोध घेऊनही कोणताही मागोवा न लागल्याने कुटुंबीय तीव्र चिंतेत होते. १२ जानेवारी रोजी पहाटे सुमारे तीन वाजता दोन अज्ञात मोबाईल क्रमांकांवरून फोन आले. फोन करणाऱ्यांनी अपहरण केल्याची कबुली देत, पोलिसांना माहिती दिल्यास संपूर्ण कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे. कुटुंबीयांचा आरोप आहे की, इतकी माहिती देऊनही पोलिसांकडून वेळीच ठोस कारवाई करण्यात आली नाही. परिणामी, अपहरणकर्त्यांनी चौघांची हत्या करून मृतदेह नदीकिनारी फेकून दिले.
परिसरात भीती व संतापाचे वातावरण
या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीती आणि तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, वेळेत कारवाई झाली असती तर ही अमानुष घटना टळू शकली असती, अशी भावना व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.