"कपडे घालून या नाहीतर गोळ्या घालू..."; जैन मुनींशी गावगुंडाचे असभ्य वर्तन, समाज संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 16:20 IST2025-12-03T16:19:35+5:302025-12-03T16:20:43+5:30
Bihar Crime: बिहारमध्ये ही धक्कादायक घटना घडली

"कपडे घालून या नाहीतर गोळ्या घालू..."; जैन मुनींशी गावगुंडाचे असभ्य वर्तन, समाज संतप्त
Bihar Crime: बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये एका जैन मुनींशी गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. सरैया पोलीस स्टेशन हद्दीतील गोपीनाथपूर डोक्रा येथे एका गुन्हेगाराने दिगंबर जैन मुनी उपासपार्जयी श्रमण श्री विशालसागर जी मुनी महाराज यांच्याशी गैरवर्तन केले. तसेच त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्नही केला. तुम्ही पूर्ण कपडे घालून या अशी धमकीही त्याने दिली. या घटनेमुळे जैन समाज संतप्त झाला आहे.
नेमके काय घडले?
सकाळच्या वेळेत, जैन मुनी त्यांच्या तीर्थयात्रेदरम्यान डोक्रा परिसरातून जात होते. अचानक दुचाकीवरून एक तरुण आला आणि मुनींंशी असभ्य वर्तन करू लागला. त्याने मुनींवर आवाज चढवला आणि ओरडून त्यांना धमकवायला लागला. "तुम्ही कपडे घाला नाहीतर माझे साथीदार तुम्हाला कपडे घालायला लावतील आणि गोळ्या घालतील," अशी धमकी त्यांनी दिली. या वर्तनामुळे जैन मुनी आणि त्यांच्यासोबत असलेले भक्त घाबरले. मुनींनी पुढे जाण्यास नकार दिला आणि राष्ट्रीय महामार्ग-७२२ च्या बाजूला ध्यानस्थ अवस्थेत शांतपणे बसले. हे पाहून त्यांचे अनुयायी संतापले आणि त्यांनी ताबडतोब पोलिसांना घटनेची माहिती दिली.
पोलिसांकडून कारवाई
घटनेची माहिती मिळताच, निरीक्षक नादिया नाझ, सरैया पोलीस स्टेशन अधिकारी सुभाष मुखिया यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकासह घटनास्थळी पोहोचल्या. तथापि पोलिस येण्यापूर्वीच दुचाकीवरील आरोपी पळून गेले. पोलिसांनी सुरक्षा कडे तयार केले आणि जैन मुनींना सुरक्षितपणे सरैया पोलीस स्टेशन परिसरातील सीमेवर नेले. स्टेशन प्रमुखांनी स्पष्ट केले की, त्या खोडसाळ तरुणाने मुनींना कपडे घालण्यास सांगितले होते, त्यानंतर तो तिथेच थांबला. माहिती मिळताच पोलीस लगेच पोहोचले, पण तेव्हा मात्र तो आरोपी आधीच घटनास्थळावरून पळून गेला.
सीतामढीमार्गे मिथिलापूर...
जैन मुनी यापूर्वी वैशाली येथील एका प्राचीन जैन मंदिरात एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. ते सोमवारी रात्री डोक्रा येथे राहिले होते आणि मंगळवारी सकाळी सीतामढी मार्गे मिथिलापूरला जात होते. घटनेनंतर ते बराच वेळ एका जागी ध्यानस्थ बसले. अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून मुनी यांना त्यांच्या बिहारमधील वास्तव्यादरम्यान प्रत्येक ठिकाणी पुरेशी सुरक्षा पोलिस अधिकाऱ्यांनी पुरवावी अशी मागणी समुदायाच्या सदस्यांनी केली आहे.