Nupur Sharma : नुपूर शर्मा यांची जीभ कापणाऱ्यास १ कोटीचे बक्षीस जाहीर करणाऱ्या भीम आर्मीच्या प्रमुखाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 15:31 IST2022-06-17T14:10:27+5:302022-06-17T15:31:11+5:30
Nupur Sharma : सतपाल तन्वर यांनी यापूर्वी घोषणा केली होती की, जो कोणी नुपूर शर्माची जीभ कापेल, त्याला एक कोटीचे बक्षीस दिले जाईल.

Nupur Sharma : नुपूर शर्मा यांची जीभ कापणाऱ्यास १ कोटीचे बक्षीस जाहीर करणाऱ्या भीम आर्मीच्या प्रमुखाला अटक
नवी दिल्ली : प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना धमकी देणाऱ्या भीम आर्मीच्या प्रमुखावर दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने भीम आर्मीचे प्रमुख नवाब सतपाल तन्वर यांना भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना फोन करून धमकी दिल्याप्रकरणी अटक केली आहे. सतपाल तन्वर यांनी यापूर्वी घोषणा केली होती की, जो कोणी नुपूर शर्माची जीभ कापेल, त्याला एक कोटीचे बक्षीस दिले जाईल.
नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबराचा अपमान केला आहे. त्यामुळे करोडो मुस्लिम समाज दुखावला गेला आहे. मोदी सरकार जाणूनबुजून नुपूर शर्माला अटक करत नाही आहे. नुपूर शर्मा ही कानपूर हिंसाचाराची खरी सूत्रधार आहे. योगी सरकारने त्यांना आरोपी का बनवले नाही असा प्रश्न भीम सेनेचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष नवाब सतपाल तन्वर यांनी उपस्थित केला.
मोहम्मद पैगंबर यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी नुपूर शर्मा यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. पक्षातून निलंबनाची कारवाई केल्यानंतर आता मुंबई पोलीस समन्स पाठवू शकतात. पायधुनी पोलिसांनी नुपूर शर्मा यांच्या विरोधात एफआयआर दाखल केल्याचे सांगितले जात आहे. रझा अकादमीने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.
नूपुर शर्मा यांच्या अडचणीत वाढ, मुंबई पोलीस पाठवू शकतात समन्स
नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त टिपण्णीवरून बराच गदारोळ झाला आहे. इस्लामिक देशांच्या संघटनेपासून ते कतार, कुवेत, इराण आणि पाकिस्तानने नाराजी व्यक्त केली आहे. भारताच्या आसपास, इस्लामिक सहकार्य संघटनेने (ओआयसी) भारताला घेरत संयुक्त राष्ट्र आणि मानवाधिकार संघटनांना भारतातील मुस्लिमांना लक्ष्य करण्याच्या विरोधात आवश्यक पावले उचलण्याचे आवाहन केले होते. ओआयसीच्या वतीने भारतात मुस्लिमांविरोधातील हिंसाचारात वाढ झाल्याचे सांगण्यात आले होते.
दुसरीकडे, एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत नुपूर शर्मा यांना भाजपमधून निलंबित करून चालणार नाही, असे म्हटले होते. नुपूर शर्माच्या अटकेची मागणी त्यांनी केली होती.