विश्वासघाताची किंमत मृत्यू! पत्नीची हत्या करुन रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या मृतदेहासोबत सेल्फी; कोयंबटूर हादरले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 15:16 IST2025-12-01T15:07:20+5:302025-12-01T15:16:04+5:30
तमिळनाडूमध्ये पत्नीने पतीची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

विश्वासघाताची किंमत मृत्यू! पत्नीची हत्या करुन रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या मृतदेहासोबत सेल्फी; कोयंबटूर हादरले
Tamil Nadu Crime: विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून तामिळनाडूतील कोयंबटूर येथे एका पतीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर आरोपी पतीने क्रूरतेची परिसीमा ओलांडत पत्नीच्या रक्ताने माखलेल्या मृतदेहासोमेत सेल्फी घेतली आणि ती आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर "विश्वासघाताची किंमत मृत्यू" या कॅप्शनसह अपलोड केली. या घटनेमुळे महिला वसतिगृहात राहणाऱ्या इतर महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे, तसेच विरोधी पक्षांनी महिला सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राजकीय संताप व्यक्त केला आहे.
पती-पत्नीमध्ये वाढला होता दुरावा
मृत महिला ही श्री प्रिया (३०), मूळची तिरुनेलवेली जिल्ह्यातील थारुवई येथील रहिवासी आहे. तर आरोपी एस. बालामुरुगन (३२), तिरुनेलवेलीचा रहिवासी आहे. या जोडप्याला १० वर्षांचा मुलगा आणि ३ वर्षांची मुलगी अशी दोन मुले आहेत. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, बालामुरुगन आणि श्री प्रिया यांच्यात काही महिन्यांपूर्वी वाद झाले होते. त्यामुळे श्री प्रिया आपल्या दोन मुलांना बालामुरुगनकडे सोडून कोयंबटूरला आली होती. ती गांधीपुरम येथील एका महिला वसतिगृहात राहत होती आणि क्रॉस कट रोडवर एका बॅगेच्या दुकानात काम करत होती.
बालामुरुगनला संशय होता की श्री प्रियाचे त्याच्या दूरच्या नातेवाईक इसाक्की राजा नावाच्या एका विवाहित पुरुषासोबत विवाहबाह्य संबंध आहेत. यावरून दोघांमध्ये अनेकदा वाद झाले होते. बालामुरुगनला अजूनही श्री प्रियाला सोबत ठेवायचे होते. शनिवारी त्याने कोयंबटूरमध्ये तिची भेट घेतली आणि इसाक्की राजासोबतचे संबंध तोडून परत घरी येऊन सुखी संसार करण्याची विनंती केली. मात्र, प्रियाने घरी परतण्यास स्पष्ट नकार दिला. त्यातच इसाक्की राजाला बालामुरुगन कोयंबटूरला आल्याचे कळले. त्याने बालामुरुगनला श्री प्रिया आणि स्वतःचा एक अत्यंत खासगी फोटो पाठवला. हा फोटो पाहून बालामुरुगन संतापला.
रविवारी दुपारी बालामुरुगन नशेतच श्री प्रियाला भेटण्यासाठी तिच्या वसतिगृहात गेला. त्या फोटोवरून दोघांमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला. बालामुरुगनने लगेच आपल्या बॅगेतून लपवून आणलेले हत्यार काढले आणि प्रियावर वार करून तिची जागीच हत्या केली. श्री प्रिया रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर, बालामुरुगनने अत्यंत थंड डोक्याने तिची क्रूर हत्या केल्याचे कृत्य केले. त्याने पत्नीच्या मृतदेहासोबत सेल्फी घेतला आणि तो त्याच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर विश्वासघाताची किंमत मृत्यू या कॅप्शनसह पोस्ट केली.
स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. रथिनापुरी पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत बालामुरुगन पत्नीच्या मृतदेहाजवळ शांतपणे बसून होता. पोलिसांनी आरोपी बालामुरुगनला तात्काळ अटक केली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी कोयंबटूर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.