Kritika Reddy : डॉक्टर कपल, कोट्यवधींचं घर अन् रहस्यमयी मृत्यू...; ६ महिन्यांनी 'परफेक्ट मर्डरचा' पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 10:30 IST2025-10-19T10:28:54+5:302025-10-19T10:30:05+5:30
Kritika Reddy : बंगळुरूतील डॉ. कृतिका रेड्डी घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. कृतिका स्किन स्पेशालिस्ट होती आणि तिचा पती महेंद्र रेड्डी जनरल सर्जन होता.

Kritika Reddy : डॉक्टर कपल, कोट्यवधींचं घर अन् रहस्यमयी मृत्यू...; ६ महिन्यांनी 'परफेक्ट मर्डरचा' पर्दाफाश
बंगळुरूतील डॉ. कृतिका रेड्डी घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. कृतिका स्किन स्पेशालिस्ट होती आणि तिचा पती महेंद्र रेड्डी जनरल सर्जन होता. महेंद्रनेच आपल्या डॉक्टर पत्नीची हत्या केली. तब्बल सहा महिन्यांनी या हत्येचा पर्दाफाश झाला आहे. २४ मे २०२४ रोजी कुटुंबियांच्या संमतीने या दोघांचं लग्न झालं होतं. मुलीच्या वडिलांनी त्यांच्या मुलीला आणि जावयाला बंगळुरूच्या एका पॉश भागात ३ कोटी रुपयांचं घर भेट दिलं.
लग्नानंतर ११ महिन्यांनी, २४ एप्रिल २०२५ रोजी सकाळी डॉ. महेंद्र रेड्डीने त्याच्या सासरच्यांना आणि नातेवाईकांना फोन करून कळवलं की कृतिका बेशुद्ध आहे आणि ते तिला रुग्णालयात घेऊन जात आहेत. रुग्णालयात २८ वर्षीय कृतिकाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. डॉक्टरांनी सांगितलं की, ती झोपेतच तिचा मृत्यू झाला. कृतिका गॅस्ट्रो, ब्लड प्रेशर आणि इतर हेल्थ कॉम्प्लिकेशन्सचा सामना करत होती.
लहान वयात अचानक झालेल्या मृत्यूने सर्वांना धक्का बसला. रुग्णालयाने नियमांनुसार स्थानिक पोलिसांना माहिती दिली. डॉ. महेंद्र रेड्डी आणि त्याच्या कुटुंबाने असा युक्तिवाद केला की, कृतिका आजारी होती आणि तिचा मृत्यू नैसर्गिक होता. पोलिसांनी पोस्टमॉर्टेम करण्याचा सल्ला दिला तेव्हा महेंद्रने सुरुवातीला आक्षेप घेतला. त्याच्या व्यवसायाचा हवाला देत त्याने तसं करण्यास नकार दिला.
डॉक्टर जावयाने स्किन स्पेशलिस्ट लेकीला संपवलं; वडिलांचा मोठा निर्णय, ३ कोटीचं घर केलं दान
डॉ. महेंद्र रेड्डी म्हणाला की, "मी एक सर्जन आहे, मला माझ्या पत्नीची स्थिती माहित आहे. पोस्टमॉर्टेमची गरज नाही." कृतिकाचे वडीलही शवविच्छेदनाची गरज नाही यावर सहमत होते. पण कृतिकाची मोठी बहीण ठाम राहिली. ती म्हणाली, "पोस्टमॉर्टेमशिवाय सत्य कसं कळेल?" सर्वांनी तिच्या आग्रहापुढे मान डोलावली. पोस्टमॉर्टेम करण्यात आलं. सुरुवातीच्या अहवालात काहीही उघड झालं नाही. डॉक्टरांनी व्हिसेरा जपून ठेवला.
सहा महिन्यांनंतर, व्हिसेरा रिपोर्ट आला. इथेच कथेला एक वळण मिळालं. रिपोर्टमध्ये प्रोपोफोल नावाच्या पदार्थाचे प्रमाण जास्त असल्याचं उघड झालं, जे भूल देण्यासाठी वापरलं जाणारं केमिकल होतं. स्पष्ट झालं की डॉ. कृतिकाला इंजेक्शनद्वारे भूल देण्यात आली होती आणि तीही जाणूनबुजून. त्या रात्री फक्त पती-पत्नी घरी असल्याने, संशयाची सुई महेंद्रवरच गेली.
कृतिकाच्या कुटुंबाने रिपोर्टच्या आधारे गुन्हा दाखल केला. पोलिसांनी महेंद्रला अटक केली. पोलिसांच्या चौकशीत महेंद्र म्हणाला, लग्नानंतर काही महिन्यांनी मी कृतिकाला मारण्याचा निर्णय घेतला होता. पण मला माझ्यावर संशय येऊ द्यायचा नव्हता. २१ एप्रिल रोजी, जेव्हा कृतिकाला पोटदुखी झाली, तेव्हा त्याने एक छोटासा डोस दिला. २२ आणि २३ एप्रिल रोजी त्याने असंच केलं.
२३ एप्रिलच्या रात्री, त्याने इतका जास्त डोस दिला की कृतिकाचा सकाळी मृत्यू झाला. पोलीस तपासात असं दिसून आलं की, महेंद्र रेड्डी संतापला होता कारण कृतिकाच्या कुटुंबाने लग्नापूर्वी तिची मेडिकल हिस्ट्री लपवली होता. कृतिकाला गॅस्ट्रो आणि ब्लड प्रेशरसह अनेक आजार होते. तिला वारंवार रुग्णालयात घेऊन जावं लागत असे. महेंद्रला आजारी महिलेशी लग्न केल्यामुळे फसवणूक झाल्यासारखं वाटलं. या रागाच्या भरात त्याने आपल्या पत्नीला मारण्याचा कट रचला.