लायटरमुळे गेला जीव; मित्राला कारच्या दरवाजाला लटकवून भिंतीवर आदळले; डॅशकॅममध्ये कैद झाला हत्येचा थरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 14:31 IST2026-01-27T14:30:31+5:302026-01-27T14:31:03+5:30
बंगळुरुमध्ये एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने केवळ एका लायटरसाठी मित्राची हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

लायटरमुळे गेला जीव; मित्राला कारच्या दरवाजाला लटकवून भिंतीवर आदळले; डॅशकॅममध्ये कैद झाला हत्येचा थरार
Bengaluru Crime: क्षुल्लक कारणावरून बंगळुरूमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअरने कारने चिरडून मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फक्त सिगारेट लायटरवरून झालेल्या वादातून एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने आपल्या मित्राला कारच्या दरवाज्याला लटकवून झाडावर आणि भिंतीवर आदळले. या क्रूर हल्ल्यात मित्राचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला असून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेला माहितीनुसार, मृत प्रशांत (३४) आणि आरोपी रोशन हे दोघे चांगले मित्र होते. रविवारी रात्री हेब्बागोडी परिसरात एका क्रिकेट सामन्याचा आनंद घेण्यासाठी ते गेले होते. सामन्यात त्यांच्या संघाचा पराभव झाला, ज्याचा राग दोघांच्याही मनात होता. त्यानंतर त्यांनी एम-५ मॉलच्या पाठीमागे बसून मद्यप्राशन केले.
लायटरवरून पेटला वाद
मद्यप्राशन करत असताना सिगारेट पेटवण्यासाठी लायटर घेण्यावरून दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. हा वाद इतका वाढला की, दोघांनी एकमेकांवर हात उचलला. संतापलेल्या रोशनने प्रशांतच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली. वाद विकोपाला गेल्यावर रोशन आपल्या कारमध्ये बसून तिथून पळू लागला.
रोशन पळून जात असताना प्रशांतने त्याला रोखण्यासाठी कारचा दरवाजा पकडला. मात्र, रोशनने कार न थांबवता वेगाने पळवली. प्रशांत चालत्या कारच्या दरवाज्याला लटकलेला असतानाही रोशनला दया आली नाही. प्रशांतला खाली पाडण्याच्या उद्देशाने रोशनने वेगाने कार झाडावर आणि कंपाउंडच्या भिंतीवर नेऊन आदळली. या भीषण धडकेत प्रशांत कार आणि भिंतीच्या मध्ये चिरडला गेला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
डॅशकॅमने उघड केला सगळा प्रकार
सुरुवातीला हा अपघात असल्याचे वाटत होते, मात्र पोलिसांनी कारचा डॅशकॅम तपासला तेव्हा सत्य समोर आले. डॅशकॅममध्ये दोघांमधील भांडण, कारचा वेग वाढवणे आणि जाणीवपूर्वक दिलेली धडक हे सर्व कैद झाले होते. या तांत्रिक पुराव्यामुळे रोशनचा हत्येचा कट उघड झाला.
दरम्यान, हेब्बागोडी पोलिसांनी घटनेच्या अवघ्या तासाभरात आरोपी रोशनला अटक केली. रोशन हा उडुपीचा रहिवासी असून एका नामांकित आयटी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे. पोलिसांनी त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.