'तुझं लग्न फक्त २ वर्षे टिकेल'; ज्योतिषाच्या भविष्यवाणीनंतर हादरलेल्या तरुणीचा टोकाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 18:34 IST2026-03-01T18:28:15+5:302026-03-01T18:34:14+5:30
ज्योतिषाच्या विधानानंतर नैराश्यातून बंगळुरूच्या तरुणीने स्वतःला संपवल्याची घटना घडली आहे.

'तुझं लग्न फक्त २ वर्षे टिकेल'; ज्योतिषाच्या भविष्यवाणीनंतर हादरलेल्या तरुणीचा टोकाचा निर्णय
Bengaluru Crime: एकीकडे आपण विज्ञानाच्या जोरावर पुढे जात असतानाच दुसरीकडे सुशिक्षित तरुण पिढी अजूनही अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकून आपला जीव गमावत असल्याचे पहायला मिळत आहे. बंगळुरूच्या बागलकुंटे परिसरात राहणाऱ्या एका २७ वर्षीय महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरने ज्योतिषाने केलेल्या वैवाहिक भविष्याच्या भीतीपोटी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.
विद्याज्योती (२७) असे मृत तरुणीचे नाव असून ती एका नामांकित कंपनीत कार्यरत होती. सध्या ती घरूनच काम करत होती. विद्याज्योतीचे कोडागू येथील एका तरुणावर प्रेम होते. महत्त्वाचे म्हणजे दोन्ही कुटुंबांनी त्यांच्या लग्नाला आनंदाने संमती दिली होती. मात्र, लग्नापूर्वी तिने एका ज्योतिषाचा सल्ला घेतला आणि तिथूनच या दुर्दैवी घटनेची सुरुवात झाली.
ज्योतिषाची 'ती' भविष्यवाणी ठरली जीवघेणी
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ज्योतिषाने विद्याज्योतीच्या पत्रिकेचा अभ्यास करून तिला सांगितले की, "तुझे वैवाहिक आयुष्य फार काळ टिकणार नाही. लग्नानंतर अवघ्या दोन वर्षांतच तुमचा घटस्फोट होईल किंवा तुम्ही एकमेकांपासून वेगळे व्हाल." या विधानामुळे विद्याज्योती पूर्णपणे हादरली. तिने आपल्या प्रियकरासोबतच्या भविष्याबाबत प्रचंड चिंता आणि विचार करण्यास सुरुवात केली.
९ दिवसांचे विधी आणि शेवटचा दिवस
ज्योतिषाने या दोषावर उपाय म्हणून तिला नऊ दिवसांचे विशेष धार्मिक विधी करण्यास सांगितले होते. विद्याज्योतीने श्रद्धेपोटी हे विधी पूर्ण केले. शुक्रवारी या पूजेचा नववा आणि शेवटचा दिवस होता. कुटुंबातील सर्व सदस्य पूजेनंतर मंदिरात जाण्याची तयारी करत होते. मात्र, घरात कोणीही नसताना विद्याज्योतीने आपल्या खोलीत गळफास लावून घेतला. जेव्हा कुटुंबीय तिला बोलावण्यासाठी गेले, तेव्हा ही धक्कादायक घटना उघडकीस आली.
पोलिसांचा तपास सुरू
बागलकुंटे पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केली आहे. प्राथमिक तपासात नैराश्य हेच आत्महत्येचे कारण असल्याचे समोर येत आहे. पोलीस आता त्या ज्योतिषाचा शोध घेत असून, त्याने तरुणीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केले का किंवा तिची दिशाभूल केली का, या दृष्टीने तपास करत आहेत.