माता न तू वैरिणी! जन्मदात्या आईने ४५ दिवसांच्या बाळाला पाण्याच्या भांड्यात बुडवून मारलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 14:19 IST2025-07-08T14:18:35+5:302025-07-08T14:19:33+5:30
एका महिलेने तिच्या ४५ दिवसांच्या नवजात बाळाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

फोटो - ndtv.in
बंगळुरूमधील एका महिलेने तिच्या ४५ दिवसांच्या नवजात बाळाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नेलमंगला येथील विश्वेश्वरपुरा येथे ही ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने बाळाला एका पाण्याच्या भांड्यात बुडवलं. गरिबीला कंटाळून तिने हे भयानक पाऊल उचललं. महिला नैराश्यात होती.
आरोपी महिला राधा हिचा पती रिक्षाचालक आहे आणि त्याला दारूचं व्यसन आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून राधाची चौकशी केली जात आहे. राधाविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राधाने तिच्या बाळाला ज्या भांड्यात बुडवलं ते भांडं गरम पाणी ठेवण्यासाठी वापरलं जात असल्याचं समोर आलं आहे.
उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यात एका नवजात बाळाचा मृतदेह आढळल्याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला आणि त्याच्या अविवाहित मेहुणीला अटक केली आहे. मुझफ्फरनगरचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक (एसएसपी) संजय कुमार यांनी सांगितलं की, गेल्या महिन्यात शहरातील कोतवाली परिसरातील रूरकी रोडवरील कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून पोलिसांनी एका नवजात बाळाचा मृतदेह ताब्यात घेतला होता, जो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता.
एसएसपी म्हणाले की, तपासादरम्यान, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे वडिलांची आणि आईची ओळख पटली. २४ जून रोजी जिल्ह्यातील कोतवाली पोलीस स्टेशन परिसरातील रूरकी चुंगीजवळ बाळाला कचऱ्याच्या डब्यात फेकण्यात आलं होतं. विवाहित अभिषेक (२७) आणि त्याची अविवाहित मेहुणी (१९) यांना अटक करण्यात आली आहे.