खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 12:04 IST2025-11-06T12:03:26+5:302025-11-06T12:04:59+5:30
मुलीच्या मृत्यूची माहिती मिळताच कुटुंब हादरून गेलं.

फोटो - आजतक
उत्तर प्रदेशातील बांदामध्ये एका नवविवाहित महिलेचा मृतदेह तिच्या सासरच्या घरी लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली. तिच्या मृत्यूची माहिती मिळताच कुटुंब हादरून गेलं. तिचा मृतदेह पाहून वडील रडत रडत म्हणाले, "मी माझ्या क्षमतेपेक्षा जास्त पैसे खर्च करून मुलीचं लग्न लावून दिलं, कर्ज घेऊन सासरच्या लोकांची हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण केली, पण त्यांनी माझ्या मुलीची हत्या केली आणि तिला असं लटकवलं." पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. कुटुंबाच्या तक्रारीवरून हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
शहर कोतवाली परिसरातील बलखंडी नाका चौकी परिसरात ही धक्कादायक घटना घडली. अटारा कोतवाली परिसरातील रहिवासी असलेल्या मुलीच्या वडिलांनी सांगितलं की, त्यांनी आठ महिन्यांपूर्वी बांदा येथील न्यू मार्केट परिसरातील मुलाशी त्यांच्या मुलीचं लग्न लावून दिलं होतं. जेव्हा ते मुलीच्या सासरच्या घरी पोहोचले तेव्हा ती पंख्याला लटकलेली दिसली. पण तिचे पाय जमिनीवर होते.
वडिलांचा दावा आहे की, त्यांच्या मुलीची हत्या करण्यात आली आहे आणि तिचा मृतदेह लटकवण्यात आला आहे. त्यांनी असंही म्हटलं आहे की कुटुंबाने त्यांच्या मुलीच्या सासरच्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण केली, त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रयत्न केले, खर्च केला. परंतु त्यांच्या मुलीची हत्या करण्यात आली. मुलीच्या कुटुंबाने पोलीस कारवाईची मागणी केली आहे.
एएसपी माविस टॉक यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहर पोलीस ठाण्याच्या बलखंडी नाका परिसरात एका नवविवाहित महिलेचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. फील्ड युनिट आणि आम्ही घटनास्थळी पोहोचलो. मृतदेह ताब्यात घेण्यात आला आणि शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. कुटुंबाच्या लेखी तक्रारीवरून हुंडाबळी प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. प्रकरणाची चौकशी करून पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.