एक फूट जमिनीसाठी नात्याचा 'खून'; आई-वडील, भावंडांनी घेतला तरुणाचा जीव, पत्नी ९ महिन्यांची प्रेग्नेंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 16:25 IST2025-10-10T16:24:47+5:302025-10-10T16:25:51+5:30
तरुण त्याच्या वडिलोपार्जित मालमत्तेवर बांधकाम करत असताना त्याचे वडील, आई, भाऊ आणि बहीण आले.

फोटो - आजतक
उत्तर प्रदेशातील बांदा येथून नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. जमिनीच्या एका छोट्या तुकड्यावरून एका तरुणाची हत्या करण्यात आली. आई-वडील आणि भावंडांनीच त्याला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करून त्याचा जीव घेतला, ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली. तरुण त्याच्या वडिलोपार्जित मालमत्तेवर बांधकाम करत असताना त्याचे वडील, आई, भाऊ आणि बहीण आले.
कुटुंबीयांनी बांधकामाला विरोध केला आणि वाद झाला, ज्यामुळे जोरदार हाणामारी झाली. तरुणाची पत्नी नऊ महिन्यांची गर्भवती आहे, तिचा दावा आहे की, तिच्या पतीची हत्या अवघ्या एका फूट जमिनीसाठी झाली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. बाबेरू कोतवाली परिसरात ही घटना घडली. गौरी खानपूर येथील रहिवासी २४ वर्षीय रामखेलावान आपल्या वडिलोपार्जित मालमत्तेवर बांधकाम करत असताना त्याच्या धाकट्या भावाने विरोध केला आणि मालमत्तेच्या वाटणीवरून दोघांमध्ये वाद झाला.
आई, वडील आणि बहीण घटनास्थळी पोहोचले, ज्यामुळे हाणामारी झाली. रामखेलावानला त्याचा भाऊ, वडील, आई आणि बहिणीने काठ्यांनी मारहाण केली. त्याची पत्नी आरतीने गंभीर अवस्थेत त्याला रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. मृताची पत्नी आरतीने पोलिसांना सांगितलं की, नवरात्रीत जमिनीची वाटणी झाली होती. आम्ही आमच्या जमिनीवर बांधकाम करत होतो. या चार जणांनी माझ्या पतीला एक फूट जमिनीसाठी मारलं. मी नऊ महिन्यांची गर्भवती आहे. माझे पती कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी रिक्षा चालवत होते.
बाबेरू पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गौरीखानपूर गावात, कुटुंबाच्या मालमत्तेवरून दोन भावांमध्ये वाद झाला. यामध्ये एक जण जखमी झाला आहे आणि त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेलं, जिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. माहिती मिळताच, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. तक्रारीच्या आधारे, गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे आणि त्यांची चौकशी सुरू आहे.