'तो' वाद टोकाला गेला! मित्राच्या लग्नासाठी आलेल्या तरुणाने जीव गमावला; डीजेवर नाचताना...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 13:09 IST2025-05-21T13:08:37+5:302025-05-21T13:09:10+5:30
मोहित हा नोएडा येथील एका कंपनीत इंजिनिअर होता. मोहित त्याच्या मित्रांसह लग्नात सहभागी होण्यासाठी श्यामला फार्म हाऊसवर पोहोचला होता.

फोटो - आजतक
उत्तर प्रदेशच्या बागपतमध्ये डीजेवर नाचताना झालेल्या किरकोळ भांडणामुळे धक्कादायक घटना घडली आहे. खेकरा शहरातील श्यामला फार्म हाऊसमध्ये झालेल्या लग्न समारंभात काही तरुणांनी इंजिनिअर मोहितला कारने क्रूरपणे चिरडून ठार मारलं. या घटनेत मोहितचे मित्र लकी आणि दीपक देखील जखमी झाले आहेत आणि त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या भांडणाचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे, जो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मोहल्ला अहिरान येथील रहिवासी मोहित हा नोएडा येथील एका कंपनीत इंजिनिअर होता. मोहित त्याच्या मित्रांसह लग्नात सहभागी होण्यासाठी श्यामला फार्म हाऊसवर पोहोचला होता. तिथे डीजेवर नाचत असताना नोएडातील काही तरुणांशी बाचाबाची झाली. तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी हस्तक्षेप करून परिस्थिती शांत केली, पण वाद तिथेच थांबला नाही. मोहित त्याच्या मित्रांसह फार्म हाऊसमधून बाहेर पडताच भांडणात सहभागी असलेले तरुणही बाहेर आले.
पुन्हा एकदा जोरदार हाणामारी झाली. याच दरम्यान, एका तरुणाने मोहित, लकी आणि दीपक यांना जाणूनबुजून त्याच्या कारने धडक दिल्याचा आरोप आहे. मोहित रस्त्यावर पडताच आरोपींनी क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आणि मोहितला कारने चिरडलं. घटनास्थळावरून पळून गेले. मोहितला रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर परिसरात खळबळ उडाली.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि तपास सुरू केला. व्हायरल व्हिडिओवरून पोलिसांनी हल्लेखोरांची ओळख पटवण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणात, बागपत पोलिसांनी कारवाई केली जाईल असं म्हटलं आहे. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन एक पथक तयार करण्यात आलं आहे आणि लवकरच आरोपीला अटक केली जाईल असंही सांगितलं.