Baba Siddique : धक्कादायक! एका महिन्यात १० वेळा केला सिद्दिकींच्या हत्येचा प्रयत्न, 'या' कारणामुळे झाले अयशस्वी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 13:38 IST2024-10-16T13:19:01+5:302024-10-16T13:38:30+5:30
Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी आणखी एक मोठा खुलासा समोर आला आहे. शूटर्सनी गेल्या महिन्यात वांद्रे आणि आसपासच्या भागात सिद्दिकी यांची हत्या करण्यासाठी १० हून अधिक वेळा प्रयत्न केले होते.

Baba Siddique : धक्कादायक! एका महिन्यात १० वेळा केला सिद्दिकींच्या हत्येचा प्रयत्न, 'या' कारणामुळे झाले अयशस्वी
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी आणखी एक मोठा खुलासा समोर आला आहे. शूटर्सनी गेल्या महिन्यात वांद्रे आणि आसपासच्या भागात सिद्दिकी यांची हत्या करण्यासाठी १० हून अधिक वेळा प्रयत्न केले होते. पण ते त्यामध्ये अयशस्वी ठरले. पोलिसांनी सांगितलं की, बाबा सिद्दिकी यांची मुलगा झिशान यांच्या कार्यालयाबाहेर हत्या करण्यात आली. ही खुली जागा असल्याने शूटर्स हत्या करण्यात यशस्वी झाले.
दाटीवाटीचा परिसर असल्याने याआधी बाबा सिद्दिकी यांची हत्या करताना शूटर्स अयशस्वी झाले होते. विविध कारणांमुळे शूटर्सना गोळीबार करण्याची संधी मिळाली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. अनेकवेळा बाबा सिद्दिकी आले नाहीत आणि जेव्हा ते आले तेव्हा अनेक समर्थक त्यांच्यासोबत असायचे त्यामुळे आरोपींना त्यांचा प्लॅन बदलावा लागायचा.
पोलिसांनी हत्या या प्रकरणातील आणखी एक आरोपी हरीश कुमार निषाद (२४) याला उत्तर प्रदेशातील कैसरगंज येथून अटक केली. त्याला २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अन्य तिघांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. गुरमेल सिंह आणि धर्मराज कश्यप अशी शूटर्सची नावं आहेत. प्रवीण लोणकर अटक केली आहे. तो शुभम लोणकरचा भाऊ आहे.
आरोपीने खरेदी केलेली बाईक पोलिसांनी जप्त केली आहे, शूटर्सना रेकीसाठी ती बाईक देण्यात आली होती. आणखी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, प्रवीणने निषादला सेकंड हँड बाईक घेण्यासाठी ६० हजार रुपये दिले होते. या बाईकवरून निषाद पुण्याहून मुंबईला गेला आणि कुर्ल्यातील त्याच्या भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या शूटर्सना दिली. बाबा सिद्दिकी यांची रेकी करण्यासाठी शूटर्सनी बाईकचा वापर केला.