५ वर्षांपूर्वी मृत्यू झालेला 'तो' रिक्षा चालवताना सापडला; पत्नीशी WhatsApp वर चॅटिंग, अखेर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 13:55 IST2025-04-19T13:54:44+5:302025-04-19T13:55:31+5:30

जवळपास ५ वर्षे आणि ९ महिन्यांनंतर पोलिसांनी लखनौमध्ये एका व्यक्तीला अटक केली.

azamgarh police arrest man declared dead 6 years ago was driving auto in lucknow | ५ वर्षांपूर्वी मृत्यू झालेला 'तो' रिक्षा चालवताना सापडला; पत्नीशी WhatsApp वर चॅटिंग, अखेर...

५ वर्षांपूर्वी मृत्यू झालेला 'तो' रिक्षा चालवताना सापडला; पत्नीशी WhatsApp वर चॅटिंग, अखेर...

उत्तर प्रदेशच्या आझमगड जिल्ह्यातील पोलिसांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. जवळपास ५ वर्षे आणि ९ महिन्यांनंतर पोलिसांनी लखनौमध्ये एका व्यक्तीला अटक केली. आरोपी अरविंद चौहान आझमगडमधील खासगी कंपनी अल्केमिस्टमध्ये काम करत होता. त्याने आपल्या अनेक नातेवाईकांचे कोट्यवधी रुपये कंपनीत जमा केले होते, पण २०१७ मध्ये ही कंपनीच बंद झाली. तेव्हा पैसे देणारी लोकं अरविंदकडे आली.

अरविंदमुळेच लोकांनी आपले लाखो रुपये गुंतवले होते. पण कंपनी बंद झाल्याने तो काहीच करू शकत नव्हता. जेव्हा लोकांचा दबाव वाढू लागला तेव्हा अरविंद त्याचा मोबाईल घरीच ठेवून १९ जुलै २०१९ रोजी लखनौला गेला. तिथे त्याने आयआयएम जवळ भाड्याने खोली घेतली आणि रिक्षा चालवायला सुरुवात केली आणि मोबाईल नंबर बदलून तो त्याच्या पत्नीशी व्हॉट्सअॅपवर चॅटिंग करायचा.

लोकांपासून वाचण्यासाठी त्याने कुटुंबीयांसोबत हा प्लॅन केला होता. अरविंदची पत्नी सुनीता हिने जहांगंज पोलीस ठाण्यात मुद्दाम पती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. २०१९ मध्ये सुनीताने कोतवाली येथे खुनाचा खटलाही दाखल केला. पतीचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. या प्रकरणात वासुदेव चौहान आणि घरबारन चौहान यांना आरोपी करण्यात आलं. मात्र आता हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं आहे.

जिल्हा एसपी हेमराज मीणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या सर्व्हिलान्स टीमने अरविंदच्या कुटुंबातील सदस्यांचे मोबाईल नंबर मिळवले आणि सीडीआर तपासला, ज्यामध्ये काही मोबाईल नंबर संशयास्पद आढळले. चौकशीत असे आढळून आले की अरविंद आयआयएम लखनऊजवळ राहत होता. या माहितीच्या आधारे आझमगड पोलिसांनी त्याला अटक केली.

चौकशीदरम्यान अरविंदने सांगितलं की, तो अल्केमिस्ट कंपनीत काम करायचा आणि २०१७ मध्ये कंपनी अचानक बंद झाली. त्याने त्याच्या नातेवाईकांचे आणि आजूबाजूच्या लोकांचे कोट्यवधी रुपये कंपनीत जमा केले होते. जेव्हा लोक त्यांचे पैसे परत मागू लागले तेव्हा तो लखनौला गेला. अरविंदने हे देखील कबूल केले की त्याने त्याचे नातेवाईक वासुदेव चौहान यांची ४,४२,००० रुपयांची फसवणूक केली आणि ते पैसे पत्नीच्या खात्यात ट्रान्सफर केले होते. त्यामुळे वासुदेव चौहान यांनी अरविंद, त्याचे वडील मुसाफिर चौहान आणि पत्नी सुनीता चौहान यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
 

Web Title: azamgarh police arrest man declared dead 6 years ago was driving auto in lucknow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.