तरुणाच्या खुनाचा प्रयत्न करणारे अटकेत, कापूरबावडी पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 20:26 IST2022-07-28T20:25:37+5:302022-07-28T20:26:11+5:30
Crime News : पोलीस कोठडीत रवानगी

तरुणाच्या खुनाचा प्रयत्न करणारे अटकेत, कापूरबावडी पोलिसांची कारवाई
ठाणे : पूर्ववैमनस्यातून दिनेश अहिरे (२२, रा. न्यू साईनाथ नगर, माजीवाडा) याच्यावर चॉपरने वार करून त्याच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या रवींद्र दुनघव (५०) याच्यासह दोघांना अटक केल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी गुरुवारी दिली. दोन्ही आरोपींना १ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
दिनेश आणि हल्लेखोर दुनघव आणि त्याचा मुलगा महेंद्र दुनघव (२७) यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. याच वादातून २७ जुलैला दुपारी १२.३० च्या सुमारास दुनघव पिता-पुत्रांनी दिनेश याच्या मानेवर आणि डोक्यावर चॉपर आणि चाकूचे वार करून त्याच्या खूनाचा प्रयत्न केला. त्याला तातडीने जवळच्याच एका खासगी रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल केले आहे.
याप्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संतोष पिंपळे यांच्या पथकाने रवींद्र आणि महेंद्र या दोघांनाही २७ जुलैला रात्री अटक केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक आशिष तोरडमल हे करीत आहेत.