'उदयनराजे भोसले बोलतोय', म्हणत अभिनेता आमिर खानची फसवणूक करण्याचा प्रयत्न; पुण्यातील तरुणावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 19:53 IST2025-07-17T19:52:33+5:302025-07-17T19:53:42+5:30
आमिर खान यांनी उदयनराजे भोसले यांना पत्र पाठवून याबाबत विचारणा केली

'उदयनराजे भोसले बोलतोय', म्हणत अभिनेता आमिर खानची फसवणूक करण्याचा प्रयत्न; पुण्यातील तरुणावर गुन्हा दाखल
सातारा : 'खासदार उदयनराजे भोसले बोलतोय,' म्हणत बाॅलिवूड अभिनेते आमिर खान यांची आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न झाला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात पुण्यातील एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या शोधासाठी शाहूपुरी पोलिसांची टीम पुण्याला रवाना झाली आहे.
अमानत शेख (वय ३१, रा. पुणे), असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून अभिनेते आमिर खान यांना थेट फोन करून ‘मी खासदार उदयनराजे भोसले बोलतोय.’ असे म्हणून संबंधिताने मॅरेथाॅन आयोजित करण्यात आली आहे. यासाठी चॅरिटी करा, असं सांगितलं. तसेच आमिर खान यांच्या स्वीय सहायकालाही फोन व मेसेज करून वारंवार संस्थेला फंड द्या म्हणून मागणी करण्यात आली.
या प्रकारानंतर अभिनेते आमिर खान यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना पत्र पाठवून याबाबत विचारणा केली. त्यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी चॅरिटीसाठी तुमच्याशी कसलाही संपर्क साधला नसल्याचे सांगितले. आमिर खान यांना फोन व मेसेज करणारी व्यक्ती कोण, हे समजण्यासाठी खासदार उदयनराजे यांचे कार्यकर्ते पंकज चव्हाण यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुरुवारी तक्रार दाखल केली.
पोलिस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी तातडीने तपास सुरू केला. संबंधित व्यक्तीचा मोबाइल नंबर ट्रू काॅलरला पाहिल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले असे नाव दिसून येत आहे. मात्र, वास्तविक त्याचे नाव अमानत शेख असून, तो पुण्यात राहणारा असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
ही अत्यंत गंभीर बाब..
अमानत शेख याने अभिनेते आमिर खान यांच्याकडून पैसे घेतले नसले तरी त्याने ज्या पद्धतीने खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावाचा वापर केला, ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्याने आणखी कुठे असे प्रकार केले आहेत का, हे त्याला ताब्यात घेतल्यानंतरच समजणार आहे.