"हे सगळ्यांच्या भल्यासाठी आहे"; लग्नाआधीच ऑफिसमध्ये महिला अँकरने स्वतःला संपवले; मृत्यूपूर्वीचा संघर्ष कॅमेऱ्यात कैद
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 11:53 IST2025-11-25T11:48:00+5:302025-11-25T11:53:16+5:30
लग्नाच्या काही दिवस आधीच एका महिला पत्रकाराने ऑफिसमध्येच स्वतःला संपवल्याची घटना समोर आली आहे.

"हे सगळ्यांच्या भल्यासाठी आहे"; लग्नाआधीच ऑफिसमध्ये महिला अँकरने स्वतःला संपवले; मृत्यूपूर्वीचा संघर्ष कॅमेऱ्यात कैद
Ritumoni Roy Death : गुवाहाटीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका स्थानिक न्यूज पोर्टलच्या महिला अँकरने तिच्या ऑफिसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी सकाळी डिजिटल न्यूज पोर्टलच्या ऑफिसमध्ये ही पत्रकार मृतावस्थेत आढळली. पुढच्या महिन्यात तिचे लग्न होणार होते. २७ वर्षीय रिमोनी रॉयने रविवारी रात्री तिच्या ऑफिसमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अवघ्या १९ दिवसांवर लग्न असताना, निमंत्रण पत्रिका वाटल्या गेल्या असताना रिमोनीने हे टोकाचे पाऊल उचलल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
रिमोनी रॉयचा ५ डिसेंबर रोजी देबाशीष बोरा याच्यासोबत लग्न होणार होते. लग्नाच्या तयारीमुळे रिमोनी गडबडीत होते. घटनेच्या आदल्या दिवशी, म्हणजेच शनिवारी ती एका मित्राच्या घरी प्री-वेडिंग सेलिब्रेशन आणि मेहंदीच्या कार्यक्रमासाठी गेली होती. मित्र-मैत्रिणींच्या म्हणण्यानुसार, ती खूप उत्साही आणि आनंदी दिसत होतं. पण कार्यक्रमानंतर ती घरी न जाता थेट ऑफिसमध्ये गेली. रात्री प्रियकर देबाशीषने तिला अनेकवेळा कॉल केले, पण तिने फोन उचलला नाही.
सोमवारी सकाळी रिमोनीचे सहकारी कार्यालयात पोहोचले तेव्हा दरवाजा आतून बंद होता. दरवाजा तोडल्यानंतर त्यांना रिमोनी रॉय पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळली. तिने स्वतःच्या शॉलचा फास तयार केला होता. पोलिसांनी तातडीने मृतदेह शवविच्छेदनासाठी गौहाटी मेडिकल कॉलेजमध्ये पाठवला. प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचे दिसून येत आहे.
सुसाईड नोट आणि सीसीटीव्ही फुटेज
पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट मिळाली आहे. त्यात फक्त "हे सगळ्यांच्या भल्यासाठी आहे. माफ करा" एवढाच मजकूर होता. या चिठ्ठीची सत्यता पडताळण्यासाठी फॉरेन्सिक टीमने ती लॅबमध्ये पाठवली आहे. रिमोनीच्या आत्महत्येचे सर्वात वेदनादायक दृश्य कार्यालयाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहे.ऑफिसचे मालक शुभम अग्रवाल यांनी सांगितले की, रिमोनी रात्री सामान्यपणे ऑफिसमध्ये आली, काम सुरू केले. त्यानंतर त्यांनी टेबलवर खुर्ची ठेवली, फास तयार केला आणि तिने आत्महत्या. फुटेजमध्ये गळफास लागल्यानंतर ती काही वेळ संघर्ष करतानाही दिसत आहे.
दरम्यान, याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. लग्नाला काहीच दिवस उरले असताना एका महिला पत्रकाराने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, यामागील सत्य शोधण्यासाठी पोलीस सध्या सर्व बाजूंनी तपास करत आहेत. आता शवविच्छेदन अहवाल आणि सुसाईड नोटच्या हस्ताक्षराची पुष्टी झाल्यानंतरच मृत्यूच्या खरे कारण उघड होण्याची शक्यता आहे.