तरुणींना प्रेमात फसवून चोर्या करणार्यास अटक; बिबवेवाडीतील प्रकरणातील १ कोटी हस्तगत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2020 20:41 IST2020-06-13T20:36:14+5:302020-06-13T20:41:11+5:30
उच्च शिक्षित असल्याचे त्याच्या शिक्षणाचा फायदा घेऊन कोणताही पुरावा सापडणार नाही याची काळजी घेऊन तो स्वत:ला अटकेपासून वाचवित होता.

तरुणींना प्रेमात फसवून चोर्या करणार्यास अटक; बिबवेवाडीतील प्रकरणातील १ कोटी हस्तगत
पुणे : श्रीमंत कुटुंबातील महिला, तरुणींना प्रेमात अडकवून त्यानंतर त्यांना बदनामीची धमकी देऊन चोर्या करणार्या अट्टल गुन्हेगाराला गुन्हेशाखेच्या युनिट ५ च्या पथकाने अटक केली. त्याने बिबवेवाडी येथील घरातून १ कोटी ७४ लाख रुपये चोरुन नेले होते.
अनिकेत सुरेंद्र बुबणे (वय ३०, रा़ कृपा अपार्टमेंट, बालाजीनगर, धनकवडी) असे त्याचे नाव आहे. त्याचा हॉटेल व्यवसाय आहे. त्याच्याकडून ९८ लाख १०हजार ५०० रुपये तसेच कार असा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
......................................
असा झाला तपास...
गुन्हे शाखेच्या युनिट ५ कडील सहायक पोलीस निरीक्षक तासगांवकर, हवालदार राजेश रणसिंग यांनी तांत्रिक विश्लेषण करुन आरोपींच्या अनेक मैत्रिणीचा शोध घेऊन त्यांना विश्वासात घेतले. त्यांना अनिकेत बुबणे याचा खरा चेहरा समजावून सांगितला. त्याच गोष्टींचा फायदा झाला. अनिकेतने त्याच्या एका जुन्या मैत्रिणीला संपर्क केला. त्यावरुन पोलिसांना तो कोठे आहे, हे ठिकाण समजले. त्यावरुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता चव्हाण यांनी आरोपीला पकडण्यासाठी दोन पथके तयार केली. त्यांनी या मैत्रिणीमार्फत अनिकेतला बाणेर भागात भेटायला बोलावले. त्यानुसार अनिकेत शनिवारी दुपारी आपल्या कारमधून तेथे आल्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याकडून ९८ लाख १० हजार ५०० रुपये हस्तगत केले असून कार इतर मुद्देमाल असा १ कोटी ८ लाख ३० हजार ५०० रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.चौकशी दरम्यान, अनिकेत बुबणे याने डेटिंग वेबसाईटवर अनेक महिला व तरुणींशी मैत्री करुन, लग्नाचे आश्वासन देऊन त्यांची बदनामी करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून रोख रक्कम किंवा दागिन्यांची चोरी करुन फसवणुककेली आहे. पिडित महिला व तरुणींनी त्याच्याविरुद्ध तक्रार करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे़
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता चव्हाण, सहायक निरीक्षक संतोषतासगांवकर, उपनिरीक्षक सोमनाथ शेंडगे, तसेच प्रदीप सुर्वे, संतोष मोहिते, दत्ता काटम, प्रविण शिंदे, राजेश रणसिंग, अमजद पठाण, सचिन घोलप, महेशवाघमारे, प्रविण काळभोर, अश्रुबा मोराळे आदींनी केली.