भरदिवसा सप्तश्रृंगी ज्वेलर्समध्ये सशस्त्र दरोडा, बंदूक-कोयत्याच्या धाकावर ४०० ग्रॅम सोन्यासह २० लाखांचा ऐवज लंपास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 22:29 IST2026-05-07T22:29:18+5:302026-05-07T22:29:58+5:30

या धाडसी घटनेमुळे अकोला पोलिसांच्या सुरक्षाव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे समोर आले असून शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Armed robbery at Saptashrungi Jewelers in broad daylight, 400 grams of gold and 20 lakhs worth of goods stolen at gunpoint! | भरदिवसा सप्तश्रृंगी ज्वेलर्समध्ये सशस्त्र दरोडा, बंदूक-कोयत्याच्या धाकावर ४०० ग्रॅम सोन्यासह २० लाखांचा ऐवज लंपास!

भरदिवसा सप्तश्रृंगी ज्वेलर्समध्ये सशस्त्र दरोडा, बंदूक-कोयत्याच्या धाकावर ४०० ग्रॅम सोन्यासह २० लाखांचा ऐवज लंपास!


अकोला : गौरक्षण रोडवरील इन्कम टॅक्स चौकाजवळ असलेल्या आदर्श कॉलनीतील सप्तश्रृंगी ज्वेलर्समध्ये गुरुवारी भरदिवसा थरारक दरोड्याची घटना घडली. एका अज्ञात दरोडेखोराने बंदूक व कोयत्याचा धाक दाखवत सुमारे ४०० ग्रॅम सोन्याचे दागिने, चांदी आणि रोकड असा एकून २० लाख रुपयांचा ऐवज लुटून दुचाकीवरून पलायन केले. या धाडसी घटनेमुळे अकोला पोलिसांच्या सुरक्षाव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे समोर आले असून शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

आदर्श कॉलनीतील उटांगळे मंगल कार्यालयाजवळ जितेंद्र विसपूते यांच्या मालकीचे सप्तश्रृंगी ज्वेलर्स आहे. गुरुवारी दुपारी जितेंद्र विसपूते दुकानात एकटेच असताना एक ग्राहक दुकानात आला होता. ग्राहक बाहेर पडताच दबा धरून बसलेल्या दरोडेखोराने शेजारील घराजवळ दुचाकी उभी केली आणि पायी चालत दुकानात प्रवेश केला. दुकानात प्रवेश करताच दरोडेखोराने बंदूक आणि कोयता दाखवत विसपूते यांना धमकावले. त्यानंतर दुकानातील सुमारे ४०० ग्रॅम सोन्याचे दागिने, चांदी आणि रोकड बॅगेत भरून तो दुचाकीवरून पसार झाला. दरोडेखोर एकटाच असल्याने परिसरातील व्यापाऱ्यांनाही घटनेची चाहूल लागली नाही. दरोडेखोर पसार झाल्यानंतर जितेंद्र विसपूते यांनी आरडाओरड केली. त्यानंतर परिसरातील व्यापाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच खदान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मात्र, तोपर्यंत दरोडेखोर पसार झाला होता. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

दरोड्यापूर्वी केली रेकी?
सप्तश्रृंगी ज्वेलर्ससमोर मोठी मोकळी जागा आहे. दुकानाच्या एका बाजूला घर असून दुसऱ्या बाजूची दोन दुकाने बंद होती. उन्हामुळे अनेक दुकानांसमोर हिरव्या नेटचे आच्छादन लावलेले आहे. याच परिस्थितीचा फायदा घेत दरोडेखोराने शेजारील घराजवळ दुचाकी उभी करून एकट्याने दरोडा टाकल्याचे समोर आले आहे. दरोड्यापूर्वी आरोपीने परिसराची रेकी केल्याचा संशय व्यक्त होत आहे.

पाच दिवसांपूर्वीच ज्वेलर्स पून्हा सूरू
जितेंद्र विसपूते यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीचे निधन झाल्याने मागील १५ दिवसांपासून ज्वेलर्स बंद होते. सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर अवघ्या चार ते पाच दिवसांपूर्वीच दुकान पुन्हा सुरू करण्यात आले होते. त्यानंतर लगेचच सशस्त्र दरोडा पडल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

Web Title : सप्तश्रृंगी ज्वेलर्स में दिनदहाड़े सशस्त्र डकैती, सोना और नकदी लूटी

Web Summary : अकोला के सप्तश्रृंगी ज्वेलर्स में बंदूक की नोक पर डकैती हुई। लुटेरा 400 ग्राम सोना, चांदी और 20 लाख रुपये नकद लेकर फरार हो गया। मोटरसाइकिल पर अकेला चोर भाग गया, जिससे स्थानीय सुरक्षा पर चिंता बढ़ गई।

Web Title : Daylight Robbery at Saptashrungi Jewelers: Gold and Cash Looted

Web Summary : Akola's Saptashrungi Jewelers was robbed at gunpoint. The robber stole 400 grams of gold, silver and cash worth ₹20 lakhs. The lone thief escaped on a motorcycle, raising concerns about local security.