शिवीगाळीतून वाद पेटला, चौघांनी मित्राचा जीव घेतला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 13:14 IST2025-05-22T13:13:47+5:302025-05-22T13:14:02+5:30
भांडेवाडीमधील स्वागतनगरमध्ये ही घटना घडली. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

शिवीगाळीतून वाद पेटला, चौघांनी मित्राचा जीव घेतला
नागपूर : शिवीगाळ करण्यावरून पेटलेल्या वादातून पारडीत सोमवारी रात्री चार आरोपींनी मित्राचीच हत्या केली. भांडेवाडीमधील स्वागतनगरमध्ये ही घटना घडली. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मोहन ऊर्फ बबलू मिश्रा (३५) असे मृताचे नाव आहे. अभिषेक विनेश कांबळे (२४, बन्सीनगर, भांडेवाडी), फैजान शेख (२८, जय दुर्गानगर, भांडेवाडी), राजकुमार इंद्रमणी तंती (६०, माँ अंबेनगर, पारडी), चंद्रशेखर राजकुमार तंती (२८, माँ अंबेनगर, पारडी) अशी आरोपींची नावे आहेत. मृत व आरोपी मित्र होते. सोमवारी सायंकाळी बबलू हा राजकुमार तंतीकडे गेला होता. त्यांचे क्षुल्लक कारणावरून भांडण झाले होते.
राजकुमार व त्याचा मुलगा चंद्रशेखरने इतर दोन आरोपींना बबलूला मारण्यासाठी उकसावले. बबलू स्वत:ला वाचविण्यासाठी तेथून घराच्या दिशेने पळाला.
छातीवर धारदार शस्त्राने वार
आरोपींनी बबलूला पकडले व त्याला अंधाऱ्या मैदानात घेऊन गेले. तेथे अभिषेक व फैजानने बबलूचा गळा तसेच छातीवर धारदार शस्त्राने वार केले.
त्याला रक्तबंबाळ अवस्थेत सोडून आरोपी फरार झाले. या प्रकाराची माहिती घटनास्थळावरील लोकांनी बबलूची बहीण कल्पनाला दिली.
तिने पोलिसांना फोन केला. पोलिस घटनास्थळी आल्यावर बबलूला मेयो इस्पितळात घेऊन गेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.