जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 20:56 IST2025-08-14T20:42:15+5:302025-08-14T20:56:43+5:30

इंदूरहून कटनीपर्यंत ६८९ किमी अंतरावर अर्चनाच्या बेपत्ता होण्यामागचे कारण शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू आहे.

Archana Tiwari Missing Case: Katni Girl Archana tiwari missing from last 7 days, police investigate | जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या

जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या

भोपाळ - मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यात राहणारी अर्चना तिवारी मागील ७ दिवसांपासून बेपत्ता आहे. ती इंदूरच्या उपकार गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहून सिव्हिल जजची परीक्षा तयारी करत होती. अर्चना रक्षाबंधन करून कटनीवरून ट्रेनमधून परतत होती. प्रवासात तिचे घरच्यांसोबत बोलणे झाले. परंतु रस्त्यातच ती चालत्या ट्रेनमधून गायब झाली आहे. अद्याप ना तिचा काही सुगावा मिळाला, ना ती स्टेशनला उतरली. मग अर्चना गेली कुठे असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. गायब होण्याआधी अर्चना तिवारीचे काही फोटो इंदूरच्या सत्कार गर्ल्स हॉस्टेलकडे जाताना दिसले. 

गुरुवार ७ ऑगस्ट २०२५,  दुपारी २ वाजून २० मिनिटे

अर्चना तिवारी तिच्या गर्ल्स हॉस्टेलमधून कटनी येथील तिच्या घरी जाण्यासाठी निघाली होती. त्यानंतर ती अचानक गायब झाली की एक आठवड्यानंतरही तिच्या बेपत्ता होण्याचं रहस्य कायम आहे. तिचा मोबाइलही स्विच ऑफ लागत आहे. चालत्या ट्रेनमधून ती कुठे गेली, ती कुणासोबत मर्जीने गेली की तिला कुणी जबरदस्ती घेऊन गेले? एखाद्या गंभीर संकटात ती सापडली नाही ना यासारखे विविध प्रश्न तिच्या बेपत्ता होण्याने समोर आले आहेत. आतापर्यंत ती केवळ इंदूरहून ट्रेनमध्ये प्रवास करायला निघाली होती आणि भोपाळपर्यंत तिने आरामात प्रवास केला होता हे स्पष्ट आहे. परंतु त्यानंतर मध्यरात्री ती तिच्या जागेवरून गायब झाली. 

इंदूरहून कटनीपर्यंत ६८९ किमी अंतरावर अर्चनाच्या बेपत्ता होण्यामागचे कारण शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू आहे. ७ ऑगस्टला ती तिच्या हॉस्टेलमधून इंदूर रेल्वे स्टेशनला पोहचली होती. तिथून इंदूर बिलासपूर नर्मदा एक्सप्रेसमध्ये ती प्रवास करत होती. ही ट्रेन संध्याकाळी ४ वाजून १० मिनिटांनी इंदूरहून रवाना होते. अर्चना बेपत्ता असल्याची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास केला तेव्हा ती ट्रेनमध्ये बसण्यापासून प्रवास सुरू होईपर्यंत सर्व माहिती मिळाली. परंतु ट्रेनच्या प्रवासात ती गायब झाली आहे. अर्चना एसी कोचमध्ये प्रवास करत होती. अर्चना तिच्या जागेवर बसली होती असं सहप्रवाशांनी सांगितले. इंदूरहून ती भोपाळपर्यंत पोहचलीही होती तेव्हा तिचे बोलणे काकाशी झाले. तेव्हा रात्रीचे १० वाजून १६ मिनिटे झाली होती. 

त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी तिला कटनी साऊथ रेल्वे स्टेशनवर उतरायचे होते. परंतु अर्चनाला नेण्यासाठी आलेल्यांना जेव्हा ती दिसली नाही तेव्हा मोठा धक्का बसला. नर्मदा एक्सप्रेस या प्लॅटफॉर्मवर ५ मिनिटे थांबते. घरचे माहिती घेतील तोवर ट्रेन निघून गेली होती. त्यात उमरिया येथील नातेवाईकांना अर्चनाबाबत सांगितले. ती कोणत्या कोचमध्ये बसली होती ते सांगितले. त्यानंतर जेव्हा तिच्या नातेवाईकांनी संबंधित कोच पाहिला पण त्याठिकाणी अर्चनाची बॅग सापडली परंतु ती नव्हती. रात्री अर्चनाला पाहिल्याचे सहप्रवाशाने सांगितले. त्यानंतर घरच्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. 

थेअरी १ 

नर्मदा नदीत काही दुर्घटना घडली नाही ना...अर्चनाने इंदूरहून भोपाळपर्यंत प्रवास केला होता. त्यानंतर पोलिसांनी तिचा सीडीआर तपासला तेव्हा नर्मदापुरम रेल्वे स्टेशनजवळ तिचा मोबाईल स्विच ऑन होता, परंतु तिथून पुढे तो बंद झाला. रात्री ११ वाजून २६ मिनिटांनी ट्रेन नर्मदापुरमला पोहचते. रेल्वे नर्मदा नदीवरून प्रवास करते, त्यामुळे चालत्या ट्रेनमधून ती नदीत पडली नाही ना...अशी शंका समोर येते. पोलिसांनी नर्मदा नदीत शोध मोहीम सुरू केली परंतु त्याचा फार काही फायदा झाला नाही.

थेअरी २ 

अर्चनाने स्वत: काही चुकीचे पाऊल उचलले नाही ना..परंतु यात पोलिसांना अद्याप काही धागेदोरे सापडत नाहीत. कारण अखेरचं अर्चनाने तिच्या काकीशी बोलणे केले होते. ती एकदम नॉर्मल होती. तिने कुठल्याही समस्या अथवा वादाचा उल्लेख केला नव्हता. हॉस्टेलमधून निघताना आणि रेल्वे स्टेशनवरील अखेरच्या सीसीटीव्ही फुटेजमध्येही ती त्रस्त दिसत नाही. तिच्या हॉस्टेलमधूनही काही संशयास्पद सापडले नाही.

थेअरी ३ 

जंगलात अर्चनासोबत काही अपघात घडला नाही ना...भोपाळ ते नर्मदापुरमपर्यंत घनदाट जंगलातून ट्रेनचा प्रवास असतो. अर्चनाचा बर्थ नंबर ३ होती, जो दरवाजाच्या अगदी जवळचा होता. बऱ्याचदा माणूस मध्यरात्री झोपेत वॉशरूमला जाण्यासाठी निघतो आणि चालत्या ट्रेनमधून अपघाताने खाली पडतो. त्यामुळे घनदाट जंगलात अर्चनासोबत काही अघटित घडले नाही ना...कारण या जंगलात वाघ, बिबटे यासारखे प्राणी आहेत. त्यामुळे या अँगलवरही पोलीस तपास करत आहेत. 

थेअरी ४ 

चालत्या ट्रेनमधून कुणी तिचे अपहरण केले का...पोलीस या प्रकरणात सर्व बाजूने तपास करत आहेत. ही शक्यता कमी आहे कारण ट्रेनमधील कुणीतरी अर्चनाचे अपहरण होताना किंवा तिच्यासोबत जबरदस्ती होताना पाहिले असेल. भोपाळ ते नर्मदापुरम रेल्वे स्टेशन किंवा अन्य कुठल्या स्टेशनवर तसे फोटो, सीसीटीव्ही फुटेज कैद झाले असते परंतु असं काही संशयास्पद दिसत नाही.

थेअरी ५ 

अर्चना तिच्या मर्जीने कुठे तरी निघून गेली...बऱ्याचदा मुली घरच्यांना न सांगता गायब होतात. एखादे अफेअर असते, घरच्यांचा त्याला नकार असतो परंतु अर्चनासोबत असं काही अद्याप समोर आले नाही. पोलीस तिच्या मोबाईलचा सीडीआर तपासत आहेत. ज्यात कुठल्याही मुलासोबत जास्त वेळ बोलताना दिसत नाही. त्यामुळे प्रेमाच्या अँगलचा अद्याप पुरावा नाही.  
 

 

Web Title: Archana Tiwari Missing Case: Katni Girl Archana tiwari missing from last 7 days, police investigate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.