पुण्यात पुन्हा ‘कार’नामा, भावे हायस्कूलजवळ कारचालकाने १२ जणांना उडविले, तिघांना फ्रॅक्चर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 06:14 IST2025-06-01T06:09:58+5:302025-06-01T06:14:23+5:30
चालक जयराम शिवाजी मुळे (वय २७) तसेच त्याचा साथीदार राहुल गोसावी यांना विश्रामबाग पोलिसांनी घेतले ताब्यात

पुण्यात पुन्हा ‘कार’नामा, भावे हायस्कूलजवळ कारचालकाने १२ जणांना उडविले, तिघांना फ्रॅक्चर
लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: शहराच्या मध्यवर्ती भागात सदाशिव पेठेत असलेल्या भावे हायस्कूलजवळ एका कारचालकाने १२ जणांना उडविल्याची घटना शनिवारी (दि. ३१) सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास घडली. यात जखमी असलेले काहीजण एमपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी असल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील तिघांचे फ्रॅक्चर झाल्याने संचेती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे, तर उर्वरित जखमींना शेजारील रुग्णालयातच दाखल केले आहे.
चालक जयराम शिवाजी मुळे (वय २७, रा. बिबवेवाडी) तसेच त्याचा साथीदार राहुल गोसावी यांना विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतले असून तो मद्यधुंद असल्याचे सांगितले जात आहे. जखमी विद्यार्थी एका चहाच्या टपरीवर चहा पिण्यासाठी सायंकाळी एकत्रित आले होते. कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने बारा जणांना धडक दिली. प्राथमिक माहितीनुसार या बारा जणांपैकी तिघांना संचेती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर अन्य नऊ जण किरकोळ जखमी असून त्यांना योगेश हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
कारचालक मद्यधुंद? तपासणीस नेले ससूनमध्ये
चालकास वैद्यकीय तपासणीसाठी पोलिसांनी ससून रुग्णालयात नेले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरु आहे.
जखमींची नावे : अविनाश दादासो फाळके, प्रथमेश पांडुरंग पतंगे, संदीप सुनील खोपडे, सोनाली सुधाकर घोळवे, मंगेश आत्माराम सुरवसे, अमित अशोक गांधी, समीर श्रीपाद भालचिकर, सोमनाथ केशव मेरूकट, प्रशांत ब्रह्मदेव बंडगर, किशोर भापकर, पायल आदेश कुमार दुर्गे, गुलणाज सिराज अहमद.
जखमी विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. त्यांची एक परीक्षा उद्या होणार आहे. त्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणे झाले असून सकारात्मक निर्णय घेण्याचा शब्द त्यांनी दिला आहे.
-हेमंत रासने, आमदार कसबा विधानसभा