Anjel Chakma : खळबळजनक! बर्थडे पार्टी, शिवीगाळ अन्... एंजेल चकमा हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 16:35 IST2025-12-30T16:32:43+5:302025-12-30T16:35:15+5:30
Anjel Chakma : डेहराडूनमध्ये झालेल्या एंजेल चकमा हत्या प्रकरणाच्या तपासात अनेक धक्कादायक तथ्य समोर आली आहेत.

Anjel Chakma : खळबळजनक! बर्थडे पार्टी, शिवीगाळ अन्... एंजेल चकमा हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा
डेहराडूनमध्ये झालेल्या एंजेल चकमा हत्या प्रकरणाच्या तपासात अनेक धक्कादायक तथ्य समोर आली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी मुख्य आरोपी सूरज खवास त्याच्या मुलाचा पहिला वाढदिवस साजरा करत होता. डेहराडूनमधील अवनीश नेगी याच्या टी-स्टॉलवर पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं.
पार्टी संपल्यानंतर आरोपी आणि त्याचे साथीदार दारू घेण्यासाठी पोहोचले, जिथे त्यांच्यात आपापसात शिवीगाळ सुरू झाली. याच दरम्यान एंजेलचा धाकटा भाऊ मायकेल याने या वादाला विरोध केला, ज्यामुळे भांडण अधिकच विकोपाला गेलं. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या वादादरम्यान मूळचा नेपाळचा असलेल्या अवस्थीने रागाच्या भरात चाकू उचलला आणि एंजेलच्या पाठीवर वार केला. चाकू लागल्यामुळे एंजेलच्या शरीराचा उजवा भाग पॅरालिसिस झाला. या प्रकरणात सहभागी असलेले दोन आरोपी अल्पवयीन आढळले असून, त्यांना बालसुधारगृहात पाठवण्यात आलं आहे.
या प्रकरणातील आणखी एक आरोपी अवनीश नेगी हा कारगिल युद्धात शहीद झालेल्या सैनिकाचा मुलगा असल्याचं सांगण्यात येत आहे, ज्यामुळे हे प्रकरण अधिक संवेदनशील बनले आहे. कुटुंबीय आणि मित्रांच्या म्हणण्यानुसार, एंजेल चकमा हा अत्यंत हुशार विद्यार्थी होता. नुकतीच त्याला एका खासगी कंपनीत महिना १ लाख रुपये पॅकेजची नोकरी मिळाली होती. त्याचा धाकटा भाऊ मायकेल सध्या बी.कॉमचं शिक्षण घेत आहे.
या प्रकरणावर डेहराडूनचे एसएसपी अजय सिंह यांनी स्पष्ट केलं आहे की, आतापर्यंतच्या तपासात कोणत्याही प्रकारच्या वांशिक किंवा द्वेषपूर्ण गुन्ह्याचे ठोस पुरावे मिळालेले नाहीत. पोलीस सर्व बाजूंनी तपास करत असून कोणत्याही दोषीला सोडलं जाणार नाही, असं त्यांनी सांगितलं. ही घटना ९ डिसेंबर २०२५ रोजी घडली होती, जेव्हा एंजेल चकमा आपल्या धाकट्या भावासोबत डेहराडूनच्या सेलाकुई परिसरात खरेदीसाठी गेला होता. त्याचवेळी दोन गटात वाद झाला आणि चाकू हल्ल्यात एंजेलची हत्या करण्यात आली.