बापरे बाप! जावई संतापला, बायको सतत माहेरी जाते म्हणून सासरच्या घरावर बुलडोझर चालवला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 11:37 IST2025-12-27T11:37:09+5:302025-12-27T11:37:31+5:30
पती आपल्या पत्नीच्या वारंवार माहेरी जाण्याच्या सवयीला इतका कंटाळला की, त्याने चक्क मद्यधुंद अवस्थेत बुलडोझर घेऊन सासरचं घर गाठलं.

बापरे बाप! जावई संतापला, बायको सतत माहेरी जाते म्हणून सासरच्या घरावर बुलडोझर चालवला अन्...
झारखंडमधील गिरिडीहमध्ये एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पती आपल्या पत्नीच्या वारंवार माहेरी जाण्याच्या सवयीला इतका कंटाळला की, त्याने चक्क मद्यधुंद अवस्थेत बुलडोझर घेऊन सासरचं घर गाठलं. संतापलेल्या पतीने सासरचं घर उद्ध्वस्त करण्याची धमकी देत घराची संरक्षक भिंत पाडून टाकली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
जमुआ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिरसिया गावात ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती, मात्र लोक जमा होण्यापूर्वीच आरोपी पती बुलडोझर घेऊन तिथून पसार झाला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचं माहेर सिरसिया गावात आहे, तर तिचे सासर काही अंतरावर असलेल्या गादी-चुंगलो गावात आहे.
"सासरचं घरच पाडून टाकू"
आरोपी पती पिंटू मंडल याने दिलेल्या माहितीनुसार, साडेचार वर्षांपूर्वी त्याचं झालं होतं. सासरी जेव्हा जेव्हा कामाची वेळ येते, तेव्हा त्याची पत्नी माहेरी निघून जाते. सासू-सासरेही तिला रोखण्याऐवजी तिचीच पाठराखण करतात. अनेकदा तिला परत आणण्याचा प्रयत्न केला, पण ती यायला तयार नाही आणि तिच्या घरच्यांनीही कधी पुढाकार घेतला नाही. इतकेच नाही तर दोन्ही मुलांनाही सासरी पाठवलं जात नाही. या त्रासाला कंटाळून 'सासरचं घरच पाडून टाकू, मग पत्नी राहील तरी कुठे?' असा विचार करून त्याने हे पाऊल उचलल्याचं समजतं.
पती दारू पिऊन येतो आणि मारहाण करतो
पिंटू मंडलची पत्नी उर्मिला हिने पतीचे आरोप फेटाळून लावले आहेत. तिने सांगितले की, तिचा पती रोज रात्री दारू पिऊन येतो आणि तिला मारहाण करतो. याच भीतीने ती आपल्या दोन्ही मुलांसह माहेरी राहते, जेणेकरून कोणतीही मोठी दुर्घटना घडू नये. तिने असेही स्पष्ट केले की ती अधूनमधून सासरी जात असते आणि आठवड्यापूर्वीच ती सासरहून माहेरी आली होती. पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.