Video : देवदूत! धावत्या रेल्वेच्या बोगीतून खाली लटकलेल्या प्रवाशाचे पोलिसांनी वाचवले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 15:49 IST2021-04-27T15:48:08+5:302021-04-27T15:49:53+5:30
Railway Incident Of nashik : धावत्या ट्रेनमध्ये चढणाऱ्या वृद्ध प्रवाशाला रेल्वे अपघातापासून रेल्वे पोलिसांनी प्रसंगावधान दाखवून जीवनदान दिले आहे. या थरारक घटनेचे सीसीटीव्ही फुटेज लोकमतच्या हाती लागले आहे.

Video : देवदूत! धावत्या रेल्वेच्या बोगीतून खाली लटकलेल्या प्रवाशाचे पोलिसांनी वाचवले प्राण
नाशिक : भारतीय रेल्वेत पॉइंटमन म्हणून कार्यरत असलेल्या मयूर शेळके यांनी प्रसंगावधान दाखवत चिमुकल्याचे प्राण वाचवले. हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला. मध्य रेल्वेच्या वांगणी स्थानकावरील ही घटना आहे. शेळके यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे मुलाचा जीव वाचवला. विशेष म्हणजे अवघ्या काही सेकंदांनी मुलाचा जीव वाचला. शेळके यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून मुलाचा जीव वाचवला. त्यांच्या या धाडसाचं अधिकाऱ्यांपासून रेल्वे मंत्र्यांपर्यंत सर्वांनी कौतुक केलं आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनीदेखील त्यांच्या धाडसाचं कौतुक करत त्यांच्यावर आपल्याला अभिमान असल्याचं म्हटलं. तसाच काहीसा थरारक प्रकार नाशिक रोड रेल्वे स्थानकावर घडला आहे. धावत्या ट्रेनमध्ये चढणाऱ्या वृद्ध प्रवाशाला रेल्वे अपघातापासून, विशेष म्हणजे रेल्वेखाली जाता जाता रेल्वे पोलिसांनी प्रसंगावधान दाखवून जीवनदान दिले आहे. या थरारक घटनेचे सीसीटीव्ही फुटेज लोकमतच्या हाती लागले आहे.
नाशिकमध्ये धावत्या रेल्वेच्या बोगीतून खाली सटकलेल्या प्रवाशाचे रेल्वे पोलिसांनी वाचविले प्राण pic.twitter.com/1DtgDFNIt1
— Lokmat (@MiLOKMAT) April 27, 2021
नाशिक रोड रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक-2 वर उत्तर प्रदेश येथून आलेली गोदान एक्सप्रेस ही मुंबईकडे जात होती. नाशिक रोड रेल्वे स्थानकावर थांबा घेतल्यानंतर एक्सप्रेस पुन्हा मुंबईच्या दिशेने वेग घेत होती. दरम्यान त्या रेल्वेतील एक वृद्ध प्रवासी बाटलीत पाणी घेण्यासाठी स्थानकावर उतरला होता. रेल्वे सुरू झाल्याचे बघून हा प्रवासी फलाटावरुन धावत सुटला बोगीत चढण्याच्या प्रयत्नात असताना त्याचा पाय सटकला आणि तो धावत्या रेल्वेला लटकला. फलाट आणि बोगीच्या पायरीवर हा प्रवासी लटकलेल्या अवस्थेत रेल्वेसोबत घसरत असल्याचे येथे बंदोबस्तावर असलेले रेल्वे पोलीस कर्मचारी इमरान कुरेशी व राकेश शेडमाके यांच्या लक्षात आले. त्यांनी प्रसंगावधान दाखवून तात्काळ धावत जाऊन त्या प्रवाशाच्या कमरेचा बेल्ट धरून त्याला फलाटावर सुरक्षित ओढले आणि गोदान एक्सप्रेसला थांबवून पुन्हा त्या प्रवाशाला बोगीत सुखरूप बसवून दिले. दैव बलवत्तर असल्याने आणि रेल्वे पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे हा प्रवाशी बचावला आहे.